
गुजरात सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गौरवासाठी आणि त्यांच्या सन्मानार्थ जाहिरातींवर 8.81 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. बीबीसीने याबाबत वृत्त दिले आहे.
7 ऑक्टोबर 2024 रोजी गुजरात सरकारने माध्यमांमध्ये काही जाहिराती दिल्या होत्या. त्यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक पदावरील 23 वर्षांच्या यशस्वी आणि सक्षम नेतृत्वाबद्दल एक जाहिरात होती
याच मालिकेतील आणखी एक जाहिरात एका प्रमुख गुजराती दैनिकात प्रकाशित झाली होती, ज्याचे शीर्षक होते ‘विकास सप्ताह यशस्वी आणि सक्षम नेतृत्वाची 23 वर्षे.’ त्याच वृत्तपत्रात प्रकाशित आणखी एका अर्ध्या पानाच्या जाहिरातीत 7 ऑक्टोबर 2001 पासून गुजरातला विकासाचा विश्वास मिळाला असे लिहिले होते. या जाहिरातींमध्ये विकसित भारताचे स्वप्नद्रष्टे, गुजरातच्या गौरवाचे प्रतीक, विकास पुरुष आणि यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदींना शुभेच्छा असे संदेश लिहिले होते.
बीबीसीने राज्य सरकारच्या गुजरात माहिती आयोगाकडे आरटीआय अर्ज दाखल करून या जाहिरातींवर झालेल्या खर्चाचा तपशील मागितला होता. उत्तरात आयोगाने सांगितले की प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि सोशल मीडियावर केवळ या दोन जाहिरातींसाठी एकूण
8 कोटी 81 लाख 01 हजार 941 रुपये खर्च करण्यात आला होता.
माहिती अधिकाराच्या उत्तरानुसार, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सांगितले की गुजरात माहिती आयोगाच्या प्रचार शाखेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक पदावरील 23 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी वृत्तपत्रातील जाहिरातींवर अंदाजे 2.12 कोटी रुपये खर्च केले.
दरम्यान, दुसऱ्या एका आरटीआय अर्जात दोन उत्तरे मिळाली. त्यापैकी एका उत्तरात माहिती आयोगाच्या प्रचार शाखेने ‘विकास सप्ताह’ अंतर्गत वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्यासाठी अंदाजे 3 कोटी 4 लाख 98 हजार रुपये खर्च केल्याचे नमूद केले होते. तर दुसऱ्या उत्तरात, आयोगाच्या माहिती उपनिदेशकांनी ‘विकास सप्ताह’च्या प्रचारासाठी इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि सोशल मीडियावर सुमारे 3 कोटी 64 लाख 03 हजार 941 रुपये खर्च केल्याचे नमूद केले होते. अशा प्रकारे एकूण खर्च सुमारे 8.81 कोटी रुपये झाला होता.