
राहुल द्रविडचा वारसदार म्हणून दशकभर ‘टीम इंडिया’ची धुरा समर्थपणे सांभाळणारा…दोन वर्षांपासून संघापासून दूर असलेला…अन् ‘टीम इंडिया’त परतण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणारा हिंदुस्थानचा कसोटी स्पेशालिस्ट फलंदाज चेतेश्वर पुजारा अखेर रविवारी (दि.24) क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून निवृत्त झाला. गेल्या महिन्यातही त्याने ‘टीम इंडिया’तील पुनरागमनासाठी सर्वस्व पणाला लावले होते. मात्र त्यातही अपयश आल्यानंतर 37 वर्षीय पुजाराने सोशल मीडियावर अचानक आपल्या निवृत्तीची घोषणा करून तमाम क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का दिला.
सात हजारांहून अधिक धावा अन् 60हून अधिक झेल चेतेश्वर पुजाराने जून 2023 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱयावर तो समालोचकाच्या भूमिकेत दिसला होता. ‘टीम इंडिया’त राहुल द्रविडनंतरचा सर्वात विश्वासू फलंदाज असलेल्या पुजाराने कसोटी कारकीर्दीत सात हजारांहून अधिक धावा अन् 60 हून अधिक झेल टिपले. म्हणजे केवळ फलंदाज म्हणूनच नव्हे, तर दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणूनही तो ख्यातनाम होता. पुजाराने 103 कसोटींत 7195 धावा पटकाविल्या, तर 66 झेल टिपले. 43.60 च्या सरासरीने धावा पटकाविणाऱया या फलंदाजाने 19 कसोटी शतकांसह 35 अर्धशतकेही ठोकली. नाबाद 206 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होय. संयमी अंदाज, मॅरेथॉन खेळी, तंत्रशुद्ध फलंदाजी आणि दक्ष क्षेत्ररक्षक असं एक कसोटी क्रिकेटचं परिपूर्ण पॅकेज म्हणून अवघं क्रिकेट जग पुजाराला ओळखतं, मात्र इंग्लंड दौऱयावर हिंदुस्थानच्या कसोटी संघात निवड न झाल्याने निराश झालेल्या चेतेश्वर पुजाराने काही दिवस वाट बघून 24 ऑगस्टला तडकाफडकी क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
एका कसोटीत शतक आणि 90 धावा
पुजाराचे नाव त्या मोजक्या हिंदुस्थानी दिग्गजांमध्ये आहे, ज्यांनी एका कसोटीच्या दोन डावांमध्ये अनुक्रमे शतक आणि 90 धावांची खेळी केली आहे. डिसेंबर 2022 मध्ये चितगाव येथील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पुजाराने पहिल्या डावात 90 धावा केल्या आणि दुसऱया डावात नाबाद 102 धावा ठोकल्या. यामुळेच त्याला ‘द्रविडनंतर हिंदुस्थानची नवी भिंत’ अशी ओळख मिळाली.
दोनवेळा शतक अन् ‘डक’
चेतेश्वर पुजाराने कसोटी कारकिर्दीत दोनवेळा एका सामन्यात शतक आणि शून्यावर बाद होण्याचा दुर्मिळ विक्रम केला आहे. 2015 मध्ये कोलंबो कसोटीत त्याने पहिल्या डावात नाबाद 145 धावा केल्या; पण दुसऱ्या डावात तो शून्यावर बाद झाला. तसेच 2018च्या मेलबर्न टेस्टमध्ये त्याने पहिल्या डावात 106 धावा केल्या, तर दुसऱया डावात खाते न उघडताच तंबूत परतला. या दुर्मिळ विक्रमामुळे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर या दिग्गजांच्या यादीत पुजाराचेही नाव जोडले गेले आहे.
सर्व चांगल्या गोष्टींचा शेवट असतो
चेतेश्वर पुजाराने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘टीम इंडिया’ची जर्सी परिधान करणे, राष्ट्रगीत गाणे आणि प्रत्येक वेळी मैदानावर उतरत सर्वोत्तम कामगिरी करणे याचा माझ्यासाठी खरोखर काय अर्थ आहे, हे शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. मात्र असं म्हणतात की, सर्व चांगल्या गोष्टींचा शेवट असतो. त्यामुळेच मी अत्यंत विचारपूर्वक क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय. तुमचं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार!’
याचबरोबर पुजाराने आपल्या पोस्टमध्ये ‘बीसीसीआय’, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचेही आभार मानले. याचबरोबर आपल्या क्रिकेट कारकीर्दीत प्रतिनिधित्व केलेल्या सर्व संघांचे, आयपीएल फ्रेंचायझींचे व काऊंटी क्रिकेट संघांचेही आभार मानण्यास तो विसरला नाही. याचबरोबर आपल्या कारकीर्दीतील सर्व प्रशिक्षक, मार्गदर्शक, संघ सहकारी सपोर्ट स्टाफ, ग्राऊंड स्टाफ, पत्रकार, मॅनेजमेंट टीम, आपले प्रायोजक या सर्वांबद्दलही चेतेश्वर पुजाराने कृतज्ञता व्यक्त केली. याचबरोबर प्रत्येक चढउतारात साथ देणाऱया आपल्या कुटुंबीयांचे त्याने आभार मानले.
अखेरपर्यंत लढलेला ‘योद्धा’
28 ऑगस्ट 2015 रोजी कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पुजाराने ‘कॅरीइंग द बॅट’ हा दुर्लभ पराक्रम केला. हिंदुस्थानचा डाव कोसळत असताना तो एकटा ठामपणे उभा राहिला आणि 289 चेंडूंवर नाबाद 145 धावा करत संघाला 312 धावांपर्यंत नेले. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर संपूर्ण डाव संपल्यावर नाबाद राहिला, तर त्याला हा मान मिळतो.
पाचही दिवस फलंदाजी करणारा तिसरा हिंदुस्थानी
16 नोव्हेंबर 2017 रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये चेतेश्वर पुजाराने पाचही दिवस फलंदाजी करून दुर्मिळ यादीत आपले नाव लावले. त्याने पहिल्या डावात 52 आणि दुसऱया डावात 22 धावा केल्या. याआधी केवळ एम. एल. जयसिम्हा (1960) आणि रवी शास्त्राr (1984) या हिंदुस्थानी फलंदाजांनीच असा पराक्रम केलेला आहे. पुजारा या यादीतील तिसरा फलंदाज ठरला.