ऑस्ट्रेलियाचा रौद्रावतार, दक्षिण आफ्रिकेचा 276 धावांनी उडवला धुव्वा; एकाच डावात तीन शतकांचाही ऑस्ट्रेलियन विक्रम

मालिकेत आधीच हरलेल्या ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या व अखेरच्या वन डे सामन्यात रौद्रावतार दाखवत यजमान दक्षिण आफ्रिकेचा 276 धावांनी धुव्वा उडवत आपल्या मालिका पराभवाचे दुःख काहीसे कमी केले. ट्रव्हिस हेड, कर्णधार मिचेल मार्श आणि कॅमरून ग्रीन यांनी शतकी खेळीसह धावांची आतषबाजी केल्यानंतर 22 वर्षीय कूपर कोनोलीने केवळ 22 धावांत 5 विकेट घेत यजमानांना 155 धावांत गुंडाळत संघाला विक्रमी विजय मिळवून दिला.

आज ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 431 धावांचा डोंगर उभा करत विश्वविक्रमी वन डे लढतीची आठवण ताजी केली. कर्णधार मिचेल मार्श (100) व ट्रव्हिस हेड (142) यांनी 250 धावांची सलामी देताना अनेक विक्रमांना मोडीत काढले. हेडने 80 चेंडूंत तर मार्शने 105 चेंडूंत शतके झळकावली, पण त्यांच्यानंतर आलेल्या कॅमरून ग्रीनने 47 चेंडूंत शतकोत्सव साजरा केला. त्याने 118 धावांच्या नाबाद खेळीत 8 षटकार आणि 6 चौकार लगावले. ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या तिन्ही फलंदाजांनी शतके ठोकत अनोखा विक्रमही साजरा केला. वन डे क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियाने प्रथमच एका डावात तीन शतके ठोकली. ही क्रिकेट इतिहासातील पाचवी वेळ असून दक्षिण आफ्रिकेनेच तीनदा हा पराक्रम केला आहे. या फटकेबाजीदरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीला अक्षरशः फोडून काढण्यात आले. वियान मुल्डरच्या 7 षटकांत तब्बल 93 धावा चोपून काढल्या.

कोनोलीचा पराक्रम

कूपर कोनोलीने जादुई फिरकी मार करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव अक्षरशः उद्ध्वस्त केला. त्याने 6 षटकांत फक्त 22 धावा देत 5 फलंदाज बाद केले आणि तो अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा सर्वात तरुण गोलंदाज ठरला. यापूर्वी 1987 मध्ये व्रेग मॅकडरमॉटने हा विक्रम प्रस्थापित केला होता. आफ्रिकेचे पहिले चार फलंदाज पन्नाशीतच बाद झाले तेथेच ऑस्ट्रेलियाने आपला विजय निश्चित केला होता.