
आशिष बनसोडे, मुंबई
गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल परत मिळवायचा म्हणजे सहज शक्य बाब नाही. कोर्टकचेरी, नियम व अटींची पूर्तता अशी तारेवरची कसरत केल्यानंतर आपली वस्तू आपल्या पदरात पडते. असे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर कश्मीरमधील एकाला त्याची एका गुह्यात जप्त असलेली दुचाकी परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पण आजारपणामुळे त्या व्यक्तीला मुंबईत येणे शक्य नसल्याने कुर्ला रेल्वे पोलीस आता स्वतः पुलवामाला जाऊन जप्त दुचाकी संबंधिताला परत करणार आहेत.
लोहमार्ग पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एम. राकेश कलासागर यांनी वर्षानुवर्षे पोलीस ठाण्यात पडून राहिलेला जप्त मुद्देमालाची निर्गती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी मोबाईल, सोनं आदी किमती ऐवज मूळ मालकांना संपर्क साधून त्यांना परत करण्यास सुरुवात केली. दरम्यान, कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात एक दुचाकी बरीच वर्षे धूळ खात पडून असल्याचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी यादव यांच्या निर्दशनास आले तेव्हा उपनिरीक्षक विजय कपिले, प्रदीप शिंदे, कस्तुरी झिमन यांनी त्या दुचाकीशी संबंधित कागदपत्रे तपासली असता वर्ष 2021 मध्ये न्यायालयाने ती दुचाकी मूळ मालकाला परत करण्याचे आदेश जारी केल्याचे समोर आले. कपिले व पथकाने मेहराज यात्तू या मालकाला संपर्क साधून दुचाकी घेऊन जाण्यास सांगितले, परंतु आजारपणामुळे त्याला कश्मीरहून मुंबईला येणे शक्य होणार नसल्याने वरिष्ठांच्या परवानगीने कुर्ला रेल्वे पोलीस लवकरच ती दुचाकी मेहराज यात्तू (50) याला पुलवामा येथे त्याच्या घरी जाऊन देणार आहेत. मुद्देमाल परत करताना त्या क्षणाचे छायाचित्र, पंचनामा करणे कायद्याने गरजेचे असल्याने पोलीस स्वतः पुलवामाला जाणार असल्याचे सांगण्यात येते.
नोटाबंदी वेळेस झाली होती फसवणूक
वर्ष 2016 मध्ये नोटाबंदी झाली तेव्हा कश्मीरचा नवाज युसूफ शहा याची फसवणूक झाली होती. तो पाटलीपुत्र एक्स्प्रेसने कश्मीरहून मुंबईला येत असताना प्रवासात त्याची पैयाज अहमद अब्दुल रज्जाक व त्याच्या अन्य दोघा साथीदारांसोबत ओळख झाली. नवाजला जुन्या नोटा बदलायच्या असल्याचे लक्षात येताच पैयाजने नवाजचा विश्वास संपादन केला. तिघांनी नवाजकडून पाच लाख घेऊन पोबारा केला होता. त्या गुन्ह्यात कुर्ला रेल्वे पोलिसांनी पैयाजला पकडून ती दुचाकी जप्त केली होती. फसवणुकीच्या पैशातून दुचाकी खरेदी केल्याचे व ती मेहराजकडे असल्याचे पैय्याजने सांगितल्यानंतर पोलिसांनी ती दुचाकी जप्त केली होती.