मालाडमध्ये विसर्जनासाठी 7 कृत्रिम तलाव, शिवसेनेचा पाठपुराव्याला यश; सुनील प्रभू यांनी घेतला आढावा

न्यायालयाने सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सहा फुटांच्या आतील सर्वच घरगुती गणेशमूर्तींचे यंदा कृत्रिमतलावांतच विसर्जन करावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत पी उत्तर पूर्व म्हणजेच मालाडमध्ये गणपती विसर्जनासाठी आणखी एक कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आला असून यंदा या तलावांची संख्या सात असेल. या संपूर्ण व्यवस्थेचा शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू यांनी आढावा घेतला.

गेल्या वर्षी मालाड पूर्व भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील एक नैसर्गिक गणपती विसर्जन स्थळासह सहा कृत्रिम तलाव आणि तीन फिरते विसर्जन तलाव होते. यंदा डॉ. बाबासाहेब उद्यानातील एका नैसर्गिक गणपती विसर्जन स्थळावरदेखील ठिकाणी एक कृत्रिम विसर्जन तलाव निर्माण करण्यात आला आहे. यामुळे यंदा पी उत्तर पूर्व भागाकरिता कृत्रिम तलावांची संख्या सात असेल. दरवर्षी पाच फूट खोल कृत्रिम तलाव तयार केले जातात. यंदा काही तलावांची खोली सहा फुटांपर्यंत असेल. एपंदरीत गणेशोत्सव आणि विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पडावी यासाठी आमदार सुनील प्रभू यांनी आज विभागातील संपूर्ण गणपती विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला. महापालिका नोडल एजन्सी, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक पोलीस विभाग, अग्निशमन विभाग, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था यांच्यासोबत सुनील प्रभू सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

मूर्ती काढून ठेवण्याची आणि पाणी बदलण्याची व्यवस्थाही

यंदा बाप्पांच्या मूर्तींची संख्या अधिक असेल. त्यामुळे सतत तलावातील मूर्ती काढून ठेवण्याची व पाणी बदलण्याची व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती सुनील प्रभू यांनी दिली असून आपल्या परिसरातील कृत्रिम तलावांची माहिती मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (MyBMC) भेट देता येईल, असेही ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील नैसर्गिक गणपती विसर्जन स्थळ, सन्मित्र मैदान गणपती विसर्जन कृत्रिम तलाव, टोपीवाला मैदान गणपती विसर्जन कृत्रिम तलाव, रामलीला गणपती विसर्जन कृत्रिम तलाव, कबड्डी महर्षी बुवा साळवी मैदान गणपती विसर्जन कृत्रिम तलाव, माँसाहेब मीनाताई ठाकरे मैदान गणपती विसर्जन कृत्रिम तलाव यांची खोली सहा फूट असेल तर  संकल्प सोसायटी गणपती विसर्जन कृत्रिम तलावाची खोली पाच फूट असणार आहे.

वरळीत गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचे काम सुरू

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख- आमदार आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार वरळीतील जांबोरी मैदान येथे नवव्या वर्षी गणपती विसर्जनासाठी 7 कृत्रिम तलावांचे भूमिपूजन करण्यात आले. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वरळी सागरी कोळी महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित पाटील, सरचिटणीस आकर्षिका पाटील यांच्या अथक प्रयत्नाने आणि मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्या वतीने कृत्रिम तलावांचे काम केले जाणार आहे.

भूमिपूजनप्रसंगी विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, सतीश आंबोडे मुंबई विकास विभाग चाळी व्यवस्थापक, महिला विधानसभा प्रमुख अनुपमा परब, शाखा संघटिका अनिता नायर, सुजाता सावंत आणि निवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.