कल्याणच्या जोशी बागेत अवतरले ‘बद्रीनाथ’, शिवनेरी गणेशोत्सव मंडळाचा भव्य देखावा

बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री ही चारधाम यात्रा आयुष्यात एकदा तरी करावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असते पण ते शक्य होतेच असे नाही. देवभूमी असलेल्या उत्तराखंडातील बद्रीनाथाचे महत्त्व तर अनन्यसाधारण आहे. कल्याणमधील भक्तांना बद्रीनाथाच्या दर्शनासाठी आता दूरवर जाण्याची गरज नाही. बद्रीनाथाच्या मंदिराचा हुबेहूब भव्य देखावा जोशी बागेतील शिवनेरी गणेशोत्सव मंडळाने साकारला आहे. हा देखावा यंदाच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

1962 सालापासून शिवनेरीच्या गणेशोत्सवाची परंपरा असून दरवर्षी अत्यंत आकर्षक असे देखावे केले जातात. यंदा बद्रीनाथाचे भव्य मंदिर बनवले एवढी असून त्याची उंची अंदाजे 27 ते 28 फूट आहे. प्लाय, बॅटन पट्टी, वॉटर कलर व अन्य इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून हे मंदिर बनवले आहे. गेल्या दीड महिन्यापासून विशेष सोनवाल यांच्या नेतृत्वाखाली विवेक राहणे, महेश नाईक, निखिल आहेर, निखिल जगताप, अभिनव नाईक, भूषण टाकळकर, ऋषी चव्हाण, मनोज शहा हे कार्यकर्ते व कलाकार मेहनत घेत होते.

आकर्षक प्रवेशद्वार व विष्णूची मूर्ती
बद्रीनाथमध्ये कपिल मुनी, गौतम आणि कश्यप यांसारख्या अनेक ऋषींनी तपश्चर्या केल्याची नोंद इतिहासात सापडते. या मंदिराच्या प्रवेशद्वाराला सिंहद्वार असेही म्हणतात. हे प्रवेशद्वारदेखील हुबेहूब तयार केले असून मंदिरामध्ये विष्णूची मूर्ती स्थापन केली जाणार आहे. शिवनेरी गणेशोत्सव मंडळाला आतापर्यंत सजावटीची अनेक पारितोषिके मिळाली असून यंदाही बद्रीनाथ मंदिराचा देखावा भक्तांच्या पसंतीस उतरेल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, सुनील आहेर व पप्पू अग्रवाल यांनी दिली.