धंदो प्रथम, वंदे मातरम! हा भाजपचा नारा, अंबादास दानवे यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

देवेंद्रजी, हिंदुस्थान-पाक सामन्यांवरून थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत आपल्याला जाण्याचे कारण नाही अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले. तसेच धंदो प्रथम, वंदे मातरम! हा भाजपचा नारा अशी टीकाही अंबादास दानवे यांनी केली.

अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, देवेंद्रजी, हिंदुस्थान-पाक सामन्यांवरून थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत आपल्याला जाण्याचे कारण नाही. घरी येणाऱ्याचा आदर करणे ही आपली संस्कृती आहे, ती त्यांनी जपली. विमान वळवून पाकच्या पंतप्रधानांचा केक कापण्यासाठी ते पाकिस्तानात गेलेले नव्हते! ते ही न बोलावता.

तसेच आपल्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे कुकर्म करणाऱ्या लोकांसोबत सामने न खेळण्याचा त्यांचा सिद्धांत कायम राहिला, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. हे असले भाष्य करून आपण त्यांच्या राष्ट्रभक्तीवर बोट दाखवत आहात का? कारण त्यांच्या सिद्धांतांचा मुखवटा घेऊन फिरणाऱ्यांच्या कुबड्या घेऊन आपण सत्तेवर बसले आहात ना? असेही अंबादास दानवे म्हणाले.

धंदो प्रथम, वंदे मातरम! हा आपल्या भाजप पक्षाचा नारा. कारण तुम्ही हिंदुस्थान-पाकिस्तान सामना अर्थकारणाच्या चष्म्यातून पाहता. आमच्यासाठी तो राष्ट्रभक्तीचा विषय आहे! ते तुम्हाला कळणार नाही. कळले तरी वळणार नाही असेही दानवे यावेळी म्हणाले.