गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज, 14 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

यंदा 27 ऑगस्ट 2025 ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत आकर्षक सजावट, देखावे आणि धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत लाखो भाविक गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी गणपती मंडपांना भेट देतील.

गणेशोत्सव निर्विघ्नपणे आणि सुरक्षितपणे साजरा व्हावा यासाठी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांच्या देखरेखीखाली 36 पोलीस उप आयुक्त, 51 सहायक पोलीस आयुक्त, 2637 पोलीस अधिकारी आणि 14,430 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, RPF, SRPF, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट आणि होमगार्ड यांचाही बंदोबस्तात समावेश आहे. गणेश विसर्जनासाठी विशेष आणि वाढीव बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गर्दीच्या ठिकाणी संयम राखून पोलिसांना सहकार्य करावे, बेवारस वस्तू आढळल्यास तात्काळ माहिती द्यावी आणि नियमांचे पालन करून उत्सव उत्साहात साजरा करावा. आपत्कालीन परिस्थितीत पोलीस हेल्पलाइन 100/112 वर संपर्क साधावा.