
अमेरिकेने हिंदुस्थानवर आयात होणाऱ्या वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावण्याची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. याचीअंमलबजावणी उद्या म्हणजेच 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:31 वाजता सुरू होईल. याआधी 7 ऑगस्ट रोजी 25 टक्के टॅरिफ लावण्यात आला होता, आता त्यात आणखी 25 टक्क्यांची भर पडली आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 ऑगस्ट रोजी हा निर्णय जाहीर केला होता. हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदी आणि व्यापार करत असल्यामुळे टॅरिफ लावण्यात आलेचे ट्रम्प यांनी म्हटले होते. या निर्णयामुळे हिंदुस्थानच्या 48.2 अब्ज डॉलरच्या निर्यातीवर थेट फटका बसण्याची शक्यता आहे. लाखो नोकऱ्या जाण्याचा धोका असून, सरकारच्या महसूलात घट होईल आणि जीडीपी वाढीवर 0.2 ते 0.6 टक्के परिणाम होऊ शकतो.
या क्षेत्रांना बसणार फटका
अमेरिकेच्या टॅरिफचा सर्वाधिक फटका ज्वेलरी, टेक्स्टाइल, ऑटोमोटिव्ह आणि सीफूड उद्योगांना बसणार आहे. या क्षेत्रांत नफ्यात घट होईल आणि अमेरिकेतील मागणी कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी उत्पादनात कपात होऊन लाखो नोकऱ्या जाण्याचा धोका आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेला होणारी निर्यात 40 ते 50 टक्क्यांनी कमी होऊ शकते. मात्र आयटी, फार्मास्युटिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रांना सध्या या टॅरिफचा फटका बसणार नाही. इलेक्ट्रॉनिक्सला सेक्शन 232 अंतर्गत सूट आहे, फार्मास्युटिकल्सवर 0 टक्के टॅरिफ आहे, मात्र ट्रम्प यांनी 150 ते 250 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची धमकी दिली आहे.