आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरावर ईडीचा छापा; कथित रुग्णालय बांधकाम घोटाळ्यात चौकशी सुरू

आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या १३ ठिकाणी ईडी छापे टाकत आहे. त्यांच्या घरावरही छापे टाकले जात आहेत. जुलैमध्ये ईडीने सौरभ भारद्वाज आणि सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध आप सरकारच्या काळात आरोग्य पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी आता छापे टाकले जात आहेत.

सौरभ भारद्वाज यांच्या घरावर ईडीच्या छापा पडल्यानंतर प्रतिक्रिया देताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, “मोदी सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्याचे हे आणखी एक प्रकरण आहे. मोदी सरकार आम आदमी पक्षाच्या मागे लागले आहे. ज्या प्रकारे आपला लक्ष्य केले जात आहे, इतिहासात कोणत्याही पक्षाला अशा प्रकारे लक्ष्य केले गेले नाही. आपला लक्ष्य केले जात आहे कारण, आपकडे मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आणि भ्रष्ट कृत्यांविरुद्ध सर्वात जास्त आवाज आहे. मोदी सरकार आमचा आवाज दाबू इच्छिते. हे कधीही होणार नाही.”

काय आहे प्रकरण?

आपच्या कार्यकाळात ५,५९० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात सौरभ भारद्वाज आणि सत्येंद्र जैन यांची भूमिका चौकशीच्या अधीन आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, २०१८-१९ मध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारने २४ रुग्णालय प्रकल्पांना मंजुरी दिली. सहा महिन्यांत आयसीयू रुग्णालये तयार करण्याची योजना होती, परंतु असे म्हटले जाते की काम अद्याप पूर्ण झाले नाही. मात्र ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. आतापर्यंत फक्त ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. दिल्ली सरकारच्या लोकनायक रुग्णालयाचा बांधकाम खर्च ४८८ कोटी रुपयांवरून १,१३५ कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचेही ईडीला आढळून आले. अनेक रुग्णालयांमध्ये योग्य मंजुरीशिवाय बांधकाम सुरू करण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. याच प्रकरणी आता तपास केला जात आहे.