
हिंदुस्थानचा ‘द वॉल’ राहुल द्रविड यांनी राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला आहे. अधिकृत निवेदनात रॉयल्सने ‘मोठी भूमिका’ ऑफर केल्याचे सांगितले, पण ही भूमिका प्रत्यक्षात संघाच्या मुख्य निर्णयांपासून द्रविड यांना दूर ठेवणारी असल्याची चर्चा आहे. म्हणजेच, ‘पद-सन्मान’च्या नावाखाली त्यांना रणनीतीतून हद्दपार करण्याचा प्रयत्न झाला आणि द्रविड यांनी तो अपमानकारक प्रस्ताव नाकारत खुर्ची सोडली.
संजूचे भवितव्य अधांतरी
राजस्थान रॉयल्सचे नियमित कर्णधार संजू सॅमसन दुखापतीमुळे 2025 च्या हंगामात मैदानाबाहेर राहिला आणि संघ तळाला फेकला गेला. संजू आता संघ बदलण्याच्या विचारात असून, त्यांनी फ्रेंचायझीला आपली भूमिका कळवली असल्याचे सूत्र सांगतात.
पराग की जैसवाल? कर्णधारपदावर मतभेद
संजूचा पर्याय म्हणून रॉयल्स व्यवस्थापनाने रियान परागचे नाव पुढे केले. 2024 मध्ये दमदार खेळ करून 573 धावा ठोकणारा पराग 2025 मध्ये मात्र कर्णधारपदावर सपशेल अपयशी ठरला. 393 धावा आणि संघाची कामगिरी बोंबलली. याच निर्णयावर द्रविड अस्वस्थ झाले.
त्यांच्या मते, यशस्वी जैसवाल किंवा ध्रुव जुरेलसारखे तांत्रिक आणि सातत्यपूर्ण खेळाडू कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार ठरले असते. पण फ्रेंचायझीने परागच्या बाजूने झुकल्याने द्रविड यांनी आपला मार्ग वेगळा केला.
‘पनिशमेंट प्रमोशन’ की अपमान?
सूत्रांचे म्हणणे आहे की द्रविडना प्रत्यक्षात संघाच्या मुख्य रणनीतीतून बाजूला सारून वरवरची पोस्ट दिली जात होती. द्रविडसारख्या शिस्तप्रिय आणि स्पष्ट वक्त्या दिग्गजासाठी हा ‘पनिशमेंट प्रमोशन’ होता, ज्याला त्यांनी थेट नकार दिला.
हिंदुस्थानसाठी अनेक वर्षे ‘भिंत’ ठरलेले द्रविड राजस्थानच्या ‘भिंतीत’ मात्र टिकू शकले नाहीत. आता सगळय़ांचे लक्ष संजूच्या पुढील पावलांवर आणि रॉयल्सच्या नव्या कर्णधारावर खिळले आहे.




























































