
मोदी यांना सततच्या विदेश पर्यटनाची चटक लागली आहे. त्यासाठी भारताची परकीय चलनाची गंगाजळी रसातळाला गेली आहे. पुन्हा इतके करून एकही देश ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताच्या बाजूने उभा राहिला नाही. आता चीन तरी काय करणार? लडाख, लेहच्या जमिनीवर चीनने आधीच अवैध ताबा घेतला आहे. अरुणाचलमधील त्याची घुसखोरी सुरूच आहे व भारताविरोधात पाकिस्तानला बळ देण्याच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. चीनने हे थांबवावे व भारताबरोबरच्या नव्या मैत्री पर्वाला सुरुवात करावी असे सांगण्याची हिंमत मोदींमध्ये नाही. कारण प्रे. ट्रम्प यांच्या सावटाखाली मोदींचे परराष्ट्र धोरण आजही सरपटते आहे.
पंतप्रधान मोदी हे नेहमीप्रमाणेच विदेश दौऱ्यावर आहेत. आधी ते जपानला गेले व नंतर चीनला दाखल झाले. जपान आणि चीनमधील अनिवासी भारतीयांनी त्यांचे म्हणे जल्लोषात स्वागत केले. ‘झिंदाबाद’ वगैरेच्या घोषणा दिल्या. मोदी यांना सध्याच्या स्थितीत भारतात राहणे कठीण झाले आहे. गेल्या काही दिवसांत त्यांच्या प्रतिष्ठेला आणि उरल्यासुरल्या विश्वासार्हतेला ग्रहणच लागले आहे. मोदी यांनी भारतात लोकशाहीच्या छाताडावर पाय ठेवून सत्ता मिळवली. निवडणूक आयोगाशी भागीदारी करून निवडणुका जिंकल्या. मतांची चोरी केली. लोकांना फसवून मोदी हे पंतप्रधान झाल्याची वावटळ राहुल गांधी यांनी उठवली. ती अर्थात विदेशातही पोहोचलीच असणार. त्यामुळे विदेशात मोदींचा डंका वाजतोय हे चित्र फसवे आहे. जे अनिवासी लोक परदेशांत मोदींचा जयजयकार करीत आहेत, त्यांना भारतातील स्थिती व लोकभावनेची कल्पना नाही. मोदी आले म्हणून भाजपच्या विदेशी शाखेने जमा केलेले हे लोक असतात. मोदी यांनी आता जपान, चीनला जाऊन काय केले? जपानमधून मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष प्रे. झेलेन्स्की यांना फोन लावला व रशिया-युक्रेन युद्धाबाबत चर्चा केली. शांतता, मानवता वगैरे अशा भूमिकांवर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केल्याचे मोदी यांनी स्वतःच जाहीर केले. म्हणजे मोदी यांनी नक्की काय केले? रशिया व युक्रेन यांच्यातले युद्ध संपले नाही. मोदी हे झेलेन्स्की यांच्याशी बोलत असताना रशियाने युक्रेनच्या सर्वात मोठय़ा युद्धनौकेवर हल्ला करून ती उद्ध्वस्त केली. त्याच वेळी मोदी यांनी झेलेन्स्की यांना सबुरीचा सल्ला दिला. शांततापूर्ण रीतीने
संघर्ष सोडवणुकीसाठी
भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. झेलेन्स्की हे पुतीनसमोर झुकायला तयार नाहीत व प्रे. ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन रशियापुढे शरणागती पत्करायला तयार नाहीत हे आधी मोदी यांनी समजून घेतले पाहिजे. प्रे. ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन पाकबरोबरचे युद्ध व्यापारी कारणासाठी थांबविणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनच्या अध्यक्षांना शांततेवर प्रवचन द्यावे हे गमतीशीर आहे. पुतीन यांची जिरवावी असे वाटणारे, पण जिरवण्याची धमक स्वतःमध्ये नसलेले अनेक देश व त्यांचे राष्ट्रप्रमुख झेलेन्स्की यांना अधूनमधून फोन करीत असतात. कारण रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना असा फोन करून शांतता, संयम यावर प्रवचन देण्याची ताकद यापैकी एकाही राष्ट्रात नाही. त्यामुळे मोदी यांनी जपानमध्ये बसून युक्रेनला फोन फिरवला याचे विशेष नाही. भाजपच्या अंध भक्तांना झेलेन्स्की-मोदी चर्चेचे कौतुक असेल तर तो त्यांचा प्रश्न. भारताला या सगळय़ाचा काडीमात्र फायदा नाही. हे सर्व रिकामटेकडेपणाचे उद्योग मानायला हवेत. मोदी जपानवरून चीनच्या भूमीवर उतरले. चीनच्या तियानजिन शहरात शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी मोदी उतरले. रशियाचे अध्यक्ष पुतीनही तेथे आले आहेत. मोदी-पुतीन यांच्या भेटीचे फोटोदेखील प्रसिद्ध झाले. प्रे. ट्रम्प यांनी धमकी देऊन भारत व रशियातील तेल व्यापार थांबवला आहे, म्हणजे भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली आहे. असे पंतप्रधान मोदी व पुतीन यांच्यात चर्चा कोणत्या मुद्दय़ावर होणार? मोदी यांनी आता चीनचे गुणगान सुरू केले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्य आणण्यासाठी भारत आणि चीनने एकत्र काम करणे महत्त्वाचे आहे. उभय देशांतील
स्थिर आणि मैत्रीपूर्ण
द्विपक्षीय संबंध प्रादेशिक आणि जागतिक शांतता व समृद्धीसाठी सकारात्मक ठरू शकतील, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. मोदी व जिनपिंग यांच्यात रविवारी चर्चा झाली. चीन आणि भारताचे तणावपूर्ण संबंध सुधारतील व नव्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा श्रीगणेशा होईल, असे कुणास वाटत असेल तर ते खरे नाही. जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्य वगैरे आणण्याची भाषा मोदी यांनी केली. आज डॉलरच्या तुलनेत रुपया इतका कोसळला की, तो 90 रुपयांपर्यंत आडवा झाला. ही भारतीय अर्थव्यवस्थेची खरी स्थिती आहे. भारतातील ‘बुलेट ट्रेन’ जपानमध्ये बनवली जात आहे व मोदी ट्रम्प यांच्या आयात शुल्काशी लढण्यासाठी भारतीयांना ‘स्वदेशी’चा मंत्र देत आहेत. स्वदेशीची इतकी चाड असेल तर पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या परदेश दौऱ्यावरील कोटय़वधींची उधळण थांबवून पुढचा काही काळ स्वदेशातच थांबायला हवे. मोदी यांना सततच्या विदेश पर्यटनाची चटक लागली आहे. त्यासाठी भारताची परकीय चलनाची गंगाजळी रसातळाला गेली आहे. पुन्हा इतके करून एकही देश ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताच्या बाजूने उभा राहिला नाही. आता चीन तरी काय करणार? लडाख, लेहच्या जमिनीवर चीनने आधीच अवैध ताबा घेतला आहे. अरुणाचलमधील त्याची घुसखोरी सुरूच आहे व भारताविरोधात पाकिस्तानला बळ देण्याच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. चीनने हे थांबवावे व भारताबरोबरच्या नव्या मैत्री पर्वाला सुरुवात करावी असे सांगण्याची हिंमत मोदींमध्ये नाही. कारण प्रे. ट्रम्प यांच्या सावटाखाली मोदींचे परराष्ट्र धोरण आजही सरपटते आहे.