
राज्य शासनाने हजारो कोटी रुपयांची बिले थकवून ठेवल्याने कंत्राटदारांमध्ये नैराश्य पसरले आहे. काही दिवसांपूर्वी हर्षद पाटील या तरुण कंत्राटदाराने शेतामध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आज मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली. प्रेमवच्छा वर्मा या कंत्राटदाराने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
राज्यातील कंत्राटदारांची तब्बल 89 हजार कोटी रुपयांची बिले महायुती सरकारने दिलेली नाहीत. कर्ज काढून कामे पूर्ण करावी लागत असल्याने सरकारकडून बिले दिली न गेल्याने कंत्राटदारांच्या मागे बँकांनी तगादा लावला आहे. सातत्याने आंदोलन करूनही सरकारने कंत्राटदारांना न्याय दिलेला नाही.
…हा सरकारने केलेला खून
58 वर्षीय प्रेमवच्छा वर्मा यांचे 70 कोटी रुपये सरकारकडे थकीत होते. पाठपुरावा करूनही सरकार दाद देत नाही आणि दुसरीकडे बँकांनी लावलेला तगादा यामुळे कंत्राटदारांमध्ये प्रचंड नैराश्य आहे. वर्मा यांची आत्महत्या नव्हे तर हा सरकारी अनास्थेने केलेला खूनच आहे, असे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी म्हटले आहे.