
मराठा समाजाला ओबीसींच्या कोटय़ातून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ओबीसी नेत्यांची आज राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मराठय़ांना ओबीसीतून आरक्षण दिले गेले तर लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव मुंबईत येतील आणि मुंबई जाम करतील, असा इशारा भुजबळ यांनी दिला.
ओबीसी नेत्यांची बैठक झाल्यानंतर भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. ओबीसी समाज आता उपोषण करणार आहे. जिह्याजिह्यातून, प्रत्येक तालुक्यातून मिरवणुका काढणार आहे. आमच्यावर अन्याय झाला तर आम्हीसुद्धा लाखोंच्या लोंढय़ाने मुंबईत आल्याशिवाय राहणार नाही, असे भुजबळ म्हणाले. ओबीसीमध्ये 374 जाती आहेत, त्यामुळे मराठा समाजाला आमच्यामध्ये टाकू नका एवढीच आमची मागणी आहे, अशी मागणी करतानाच, ब्राम्हण, मारवाडय़ांना शेती आहे म्हणून त्यांना कुणबी म्हणणार का? असा सवाल यावेळी भुजबळ यांनी उपस्थित केला.