
जम्मू-कश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील मेनधर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) पाकव्याप्त कश्मीरमधून (PoK) आलेल्या दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु हिंदुस्थानी लष्कराने हा प्रयत्न हाणून पाडला आहे. सोमवारी सकाळी सुमारे ५:३० वाजता बालाकोट परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यावर लष्कराने गोळीबार करून घुसखोरी रोखली. दहशतवाद्यांनी प्रत्युत्तरात जोरदार गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर लष्कराने त्या भागाची घेराबंदी करून शोध मोहीम सुरू केली आहे.
पुंछमध्ये एक दिवस आधी शस्त्रांसह दोन दहशतवाद्यांना अटक
दरम्यान, याआधी जम्मू आणि कश्मीर पोलिसांनी रविवारी पूंछ जिल्ह्यातील आजमाबाद येथून दोन दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रे देखील जप्त करण्यात आली. आजमाबाद येथील तारिक शेख आणि चेंबर गावातील रियाज अहमद, अशी या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आजमाबाद येथील तारिक शेखच्या घरावर छापा टाकला आणि त्याला त्याच्या साथीदार अहमदसह अटक केली.




























































