
मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन पुकारले असून उपोषण सुरू केले आहे. दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या कुटुंबीयांनीही अन्नत्याग केला आहे. 29 ऑगस्टपासून जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यापासून बीडमध्ये त्यांच्या पत्नी आणि मुलांनीही अन्नाच एक कणही घेतलेला नाहिये.
टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. जरांगे पाटील यांच्या पत्नी सुमित्रा पाटील म्हणाल्या की 2003 साली आमचे लग्न झाले आहे. पाटील यांनी आपले आयुष्य मराठा समाजासाठी वाहून घेतले आहे. जरांगे पाटील यांची मुलगी कन्या पल्लवीने आपल्या वडिलांबाबत काळजी व्यक्त केली आहे. आम्ही मुंबईत काय घडतंय याची दृश्य टीव्हीवर पाहिली आणि भिती वाटली असे पल्लवी म्हणाली. बाबांनी आम्हाला आंदोलन स्थळी येऊ नका असे स्पष्ट सांगितले आहे. तसेच आम्ही त्यांना फोनसुद्धा केला नाही अशी माहिती त्यांचा मुलगा शिवराजने दिली आहे.
जरांगे पाटील मुळचे बीड जिल्ह्याच्या मातोरी तालुक्याचे . अपूरा पाऊस आणि पीकांच्या नुकसानीमुळे जरांगे पाटलांनी अंकूशनगरमध्ये काही जमीन घेतली आणि कसायला सुरुवात केली. पण 2013 साली मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी ती सुद्धा विकून टाकल्याचे पत्नी सुमित्रा यांनी सांगितले. सरकार यावर लवकरात लवकर तोडगा काढेल अशी आशाही सुमित्रा पाटील यांनी व्यक्त केली.