संजू सॅमसनला संधी मिळणे कठीण, इरफान पठानचा दावा

आगामी आशिया कपसाठी संजू सॅमसनची हिंदुस्थानी संघात निवड झाली असली तरी त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणे कठीण आहे. शुभमन गिलला जागा देण्यासाठी सॅमसनला बाहेर बसावे लागेल, असे मत व्यक्त केलेय माजी अष्टपैलू इरफान पठाणने.

एका क्रिकेट कार्यक्रमात इरफान भरभरून बोलला. तो म्हणाला, संजूने चांगली कामगिरी केली आहे, पण त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभावच दिसतो. तो कधी शतक ठोकतो, तर कधी लवकर माघारी परततो. अभिषेक शर्मा झंझावाती फलंदाजीमुळे सलामीला कायम असेल. तसेच जितेश शर्मा उपलब्ध असल्याने गिलला सलामीवीर म्हणून उतरवण्याचा पर्याय अधिक मजबूत आहे. मीही हाच पर्याय स्वीकारेन.

इरफानच्या मते, हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये पुढील सर्व फॉरमॅटचा कर्णधार शोधला जात आहे आणि त्यात गिल सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. धोनीनंतर विराट कोहली आणि मग रोहित शर्मा यांनी नेतृत्वाची जबाबदारी उत्तम निभावली. आता गिल हाच सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे सॅमसनला बाहेर राहावे लागू शकते. मात्र त्याला पाचव्या क्रमांकावर खेळवता येईल, पण त्यामुळे जितेशला मधल्या फळीत हलवावे लागेल. गिलला मात्र वरच्या क्रमावरच खेळवायला हवे. कारण तिलक वर्माने तिसऱया स्थानावर छाप पाडली आहे. आशिया कपमध्ये गिलसाठी काही बदल नक्कीच होतील, मात्र संजूसाठी फार बदल होण्याची शक्यता कमीच असल्याचेही पठाण म्हणाला.