रोहित-कोहलीच्या निवृत्तीनंतर पंतच खरा ‘मॅचविनर’, इंग्लंडचा माजी यष्टिरक्षक रोलँड बुचरचे मत

फोटो - BCCI

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधील निवृत्तीनंतर हिंदुस्थानी संघाला त्यांच्या अनुपस्थितीची प्रखरतेने उणीव भासेल आणि वर्तमान संघात ऋषभ पंत हाच एकमेव खरा ‘मॅचविनर’ खेळाडू असल्याचेही इंग्लंडचा माजी यष्टिरक्षक रोलँड बुचरने मांडलेय.

हिंदुस्थानी व्यवस्थापनाने रोहितनंतर शुभमन गिलवर विश्वास ठेवत त्याला नेतृत्व दिले. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत गिलने तरुण कर्णधार म्हणून दमदार सुरुवात केली आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत ठेवली. तथापि, बुचरच्या मते इंग्लंडमधील अनुपूल खेळपट्टय़ांमुळे गिलसाठी हे तुलनेने सोपे ठरले. त्याला अजून कर्णधार म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित करावी लागेल,  असेही बुचर म्हणाला.

बुचर पुढे सांगितले, रोहित आणि विराट सामन्याचा प्रवाह एकटय़ाने बदलू शकत होते. त्यांच्या जागी आलेले खेळाडू चांगले आहेत, धावा करतीलही; पण ते लवकर सामना संपवू शकतील असे नाही. त्यामुळे पुढील काही वर्षे हिंदुस्थानसाठी संक्रमणाचा काळ असेल. सध्या संघात ऋषभ पंत हाच खरा मॅच-विनर खेळाडू आहे.

त्याने पुढे नमूद केले की, रोहित-कोहलीसारखी सातत्याने सामना जिंकवून देणारी क्षमता दाखवणारे नवे खेळाडू हिंदुस्थानला शोधावे लागतील, तेव्हाच गिलचे नेतृत्व अधिक सक्षम होईल.