
टॅरिफ कमी करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केलेली ट्रेड डील जपानी पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या अंगाशी आली आहे. अवघ्या 11 महिन्यांत इशिबा यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. पक्षाचा लागोपाठ झालेला पराभव हेही त्यांच्या राजीनाम्याचे कारण ठरले आहे.
इशिबा हे जपानी राजकारणावर अनेक दशकांपासून पकड असलेल्या लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष आहेत. तसेच देशाचे पंतप्रधानपदही त्यांच्याकडे होते. ट्रम्प यांनी टॅरिफचा धडाका लावल्यानंतर त्यातून मार्ग काढण्यासाठी इशिबा यांनी अमेरिकेशी व्यापार करार केला. टॅरिफ कमी करण्याच्या बदल्यात इशिबा यांनी अमेरिकेत 550 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे मान्य केले. या कराराचा जपानच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. देशाच्या ऑटोमोबाइल उद्योगाची आर्थिक वाढ मंदावली. इशिबांच्या या निर्णयामुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आणि त्याचा परिणाम पुढील निवडणुकांमध्ये दिसला.
मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीत एलडीपीला कनिष्ठ सभागृहात बहुमत गमवावे लागले होते. या वर्षी वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे पक्षात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. पक्ष फुटीच्या उंबरठय़ापर्यंत आला होता. इशिबा यांची हकालपट्टी करण्याची रणनीती पक्षांतर्गत विरोधकांनी आखली होती. तत्पूर्वीच, त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली.
बहुमत नसूनही पंतप्रधानपदाला चिकटून होते!
दोन्ही सभागृहात बहुमत गमावूनही इशिबा पंतप्रधानपदी होते. त्यांच्या पक्षाच्या जागा घटल्या असल्या तरी दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडे सरकार स्थापन करण्याइतके संख्याबळ नव्हते. त्याचा फायदा इशिबा यांनी उठवला. छोटय़ा छोटय़ा पक्षांचा पाठिंबा घेऊन ते सरकार चालवत होते. मात्र पक्षातूनच विरोध तीव्र झाल्याने त्यांना शस्त्र टाकावी लागली.
आठ दिवसांपूर्वीच मोदींसोबत बुलेट सफर
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचा दौरा केला होता. त्यावेळी इशिबा यांच्यासोबत त्यांनी द्विपक्षीय सहकार्याची चर्चाही केली होती. तसेच, दोन्ही नेत्यांनी बुलेटची सफरही केली होती.