
आईवडिलांनी मुलीला घर भेट दिले व त्यानंतर आईचे निधन झाल्यास या भेटीचा करार रद्द होऊ शकतो का, असा मुद्दा उच्च न्यायालयात उपस्थित झाला आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस धाडली आहे.
न्या. एन. जे. जमादार यांच्या एकल पीठाने ही नोटीस जारी केली आहे. तसेच वडिलांनीही न्यायालयाने नोटीस बजावली आहे. या मुद्दय़ाचे या प्रतिवादींनी प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत तहकूब केली.
न्यायाधिकरणाच्या आदेशाला स्थगिती
मुलीने घराचा ताबा आईवडिलांना परत द्यावा हे न्यायाधिकरणाचे आदेश न्या. जमादार यांनी स्थगित केले. या घरामध्ये आईचा असलेला हिस्सा व अन्य मुद्दे यांचा खुलासा व्हायला हवा, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
काय आहे प्रकरण
या आईवडिलांनी मुलीला घर भेट दिले. त्याचा करार झाला. मात्र मुलीच्या जाचाला पंटाळून आईवडिलांनी ज्येष्ठ नागरिक कल्याण न्यायाधिकरणाचे दार ठोठावले. न्यायाधिकरणाने हा करार रद्द केला. घराचा ताबा आईवडिलांना देण्याचे आदेश न्यायाधिकरणाने मुलीला दिले. त्याविरोधात मुलीने याचिका दाखल केली. न्यायाधिकरण अशा प्रकारे आदेश देऊ शकत नाही, असा दावा मुलीने केला. या सुनावणीत आईचे निधन झाल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.