
हुडकोकडून दोन हजार कोटींचे कर्ज
नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेच्या अंतर्गत राज्यातील विविध महापालिकांना विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हुडकोकडून दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 822 कोटी 22 लाख रुपये, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चार मलनिःस्सारण प्रकल्पासाठी 268 कोटी 84 लाख रुपये तर मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 116 कोटी 28 लाख रुपयांचे कर्ज उभारणी करता येणार आहे.
इंटेलिजन्स ब्युरोला पनवेलमध्ये जमीन
केंद्र सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरोला रायगड जिह्यातील आसुडगाव (ता. पनवेल) येथील शासकीय गायरानातील चार हेक्टर जमीन देण्यास मान्यता देण्यात आली. या जमिनीवर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सब्सिडरी इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सेवा-निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत.
जलसिंचन योजनांना वीज बिलात सवलत
शेतकऱ्यांसाठीच्या अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीजदर सवलत योजनेस आणखी दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आला. यामुळे राज्यातील सुमारे 1 हजार 789 उपसा सिंचन योजनांच्या खर्चात मोठी बचत होण्याबरोबरच त्याचा थेट फायदा उपसा सिंचन योजनांशी निगडित शेतकऱ्यांना होणार आहे.