सफर-ए-यूएई – कुलदीप अन् अर्शदीपसाठी संधी!

>>संजय कऱ्हाडे

हिंदुस्थानसारख्या तगडय़ा संघाविरुद्ध संयुक्त अरब अमिराती संघाने फारशा आशा बाळगणं म्हणजे किंचित धाडसाचंच, पण  आम्ही निर्धास्तपणे खेळू, असं अमिराती संघाचा प्रशिक्षक लालचंद राजपूतने म्हटलंय. अर्थात, टी-20 खेळाचा नूरच असा असतो की त्याला अन् त्याच्या संघाला त्यांच्या आशा जिवंत ठेवाव्याच लागतील!

गौतम गंभीरसाठी मात्र काही बोलण्याची आवश्यकता नाही. हिंदुस्थानचा संघच तसा बलवान आहे. अभिषेक, शुभमन, सॅमसन, कर्णधार सूर्यकुमार, हार्दिक, अक्षर, रिंकू, बुमरा, अर्शदीप, कुलदीप आणि वरुणसारखे जबरदस्त खेळाडू ज्या संघात आहेत त्या संघाच्या प्रशिक्षकाच्या वतीने अशा टी-20 बहाद्दरांची कामगिरीच बोलत असते.

विराट आणि रोहितची अनुपस्थिती कागदावर दिसतेय, पण प्रत्यक्ष मैदानावर तितकी जाणवू नये.

एक मात्र खरं, ही स्पर्धा एकूणच कुलदीपसाठी मोठी संधी ठरणार आहे. खेळपट्टय़ा संथ असतील, चेंडूला चांगली फिरक मिळेल आणि अमिराती फलंदाजांना कुलदीपचे चायनामन चक्रावून सोडणारे ठरतील. हार्दिक, अक्षर आणि रिंकू यांनासुद्धा आपापली उपयुक्तता या सामन्यात सिद्ध करता येईल.

अर्शदीप थोडा खर्चिक ठरतो. पण संपूर्ण इंग्लंडचा दौरा बाकावर बसून काढल्यानंतर तोसुद्धा जोरदार कामगिरी करण्यासाठी कमालीचा उत्सुक असेल.

बुमराबद्दल काय बोलायचं? तो तर टी–20 चा बादशहा आहे. चार षटकांची गोलंदाजी त्याच्यासाठी फार मोठा ताण ठरू नये. इंग्लंडमध्ये कसोटी दौऱ्यात त्याच्यावर पडणाऱ्या ताणामुळे आणि त्यामुळे त्याने महत्त्वाचे सामने न खेळल्यामुळे झालेली टीका त्याला नाराज करून गेली असं कळलंय. आता तो टीकाकारांची तोंडं बंद करण्यास उत्सुक असेल तर आश्चर्य वाटायला नको!

सामने उशिराने सुरू होणार असल्याने रात्री पडणारं दव लक्षात घेता नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करणं संघाच्या पथ्यावर पडू शकतं.

कप्तान मोहम्मद वसीम, आलिशान शराफू आणि डावरा हैदर अली सोडले तर अमिराती संघाकडे मिरवण्यासारखं फारसं काही नाही. पण हिंदुस्थानसारख्या बलाढय़ संघाकडून मिळणाऱ्या पराभवातूनही शिकण्यासारखं असेलच. शुभेच्छा!