
आशिया कपचा थरार बुधवारपासून सुरू झालाय आणि आगामी वर्षात पुरुषांच्या टी-20 वर्ल्ड कपचा झंझावात 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 या कालावधीत हिंदुस्थान आणि श्रीलंकेत धडकण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा हिंदुस्थान आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार असून यात 20 संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेतील सामने हिंदुस्थानातील पाच तर श्रीलंकेतील दोन मैदानांवर खेळविले जाणार आहेत. वर्ल्ड कपचा अंतिम सामना अहमदाबाद किंवा कोलंबो येथे खेळविण्याची शक्यता आहे. जर पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचला, तर सामन्याचे ठिकाण ठरवताना राजकीय परिस्थिती लक्षात घेण्यात येणार आहे. सध्या हिंदुस्थान आणि पाकिस्तान एकमेकांच्या देशात क्रिकेट सामने खेळत नसल्यामुळे या स्पर्धेतील पाकिस्तानचे सामने हायब्रीड मॉडेलनुसार श्रीलंकेत खेळविले जाणार आहेत.
15 संघ निश्चित, 5 संघांची निवड बाकी
आयसीसीकडून अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसले तरी सहभागी देशांना प्राथमिक माहिती दिली आहे. आतापर्यंत 15 संघ निश्चित झाले आहेत, यात हिंदुस्थान, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, पॅनडा, नेदरलँड्स आणि इटली (पहिल्यांदाच विश्वचषकात) हे 15 संघ निश्चित झाले आहेत. उर्वरित 5 संघांपैकी दोन आफ्रिका विभागीय पात्रता फेरीतून आणि तीन आशिया व ईस्ट-एशिया पॅसिफिक पात्रता फेरीतून निश्चित केले जाणार आहेत.
2024 च्या वर्ल्ड कपसारखाच फॉरमॅट
या स्पर्धेचा फॉरमॅट 2024 विश्वचषकासारखाच असेल. त्यात 20 संघांना प्रत्येकी पाच संघांच्या चार गटांत विभागले जाईल. प्रत्येक गटातील पहिल्या दोन संघांना सुपर-आठ फेरीत प्रवेश मिळेल. त्यानंतर दोन गटांत विभागलेल्या आठ संघांपैकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. संपूर्ण स्पर्धेत 55 सामने झाले होते. 2026 च्या पहिल्या चार महिन्यांत हिंदुस्थानात क्रिकेटचा महोत्सव रंगणार आहे. जानेवारीत महिला प्रीमियर लीग होईल, त्यानंतर लगेचच टी–20 विश्वचषक रंगेल. यानंतर आयपीएलची (15 मार्च ते 31 मे ) फटकेबाजी पाहायला मिळेल. तसेच 11 ते 31 जानेवारीदरम्यान न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळविली जाणार आहे.