हिंदुस्थानला कांस्य, ओमानवर शूटआऊटमध्ये मात

हिंदुस्थानी फुटबॉल संघाने पहिल्याच सीएएफए नेशन्स कप फुटबॉल स्पर्धेत ऐतिहासिक यश मिळवले आहे. ताजिकिस्तानमधील हिसोर सेंट्रल स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानाच्या प्ले ऑफ सामन्यात हिंदुस्थानने ओमानचा 3-2 अशा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करून कांस्यपदक पटकावले.

फुटबॉलच्या जागतिक क्रमवारीत ओमान 79 व्या स्थानावर असून, हिंदुस्थानी संघ 133 व्या क्रमांकावर आहे, मात्र तरीही हिंदुस्थानी खेळाडूंनी शिस्तबद्ध खेळ आणि दृढ बचावाच्या जोरावर हा पराक्रम केला. सामना नियमित वेळेत 1-1 अशा बरोबरीत संपला होता. जमीअल अल यहमादीने 55 व्या मिनिटाला गोल करीत ओमानचे खाते उघडले, परंतु 80 व्या मिनिटाला उदांता सिंहने अप्रतिम हेडर मारत हिंदुस्थानला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.  सामन्याच्या अतिरिक्त वेळेत 96 व्या मिनिटाला ओमानचा अली अल बुसेदीला रेड कार्ड मिळाले आणि संघ 10 खेळाडूंवर आला.

पेनल्टी शूटआउटमध्ये चमकले हिंदुस्थानी

शूटआउटमध्ये लालियानजुआला छांगते, राहुल भेके आणि जितिन एम. एस. यांनी हिंदुस्थानसाठी गोल केले. अनवर अलीचा शॉट वाचवला गेला आणि उदांता चुकला. ओमानकडून फक्त थानी अल रुशैदी आणि मुहसन अल घस्सानी यांनाच गोल करता आले. निर्णायक क्षणी हिंदुस्थानी कर्णधार व गोलरक्षक गुरप्रीत सिंह संधूने अल यहमादीचा शॉट अडवून हिंदुस्थानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. हिंदुस्थानने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात ओमानला पराभूत केले. याआधी 2000 पासून झालेल्या नऊ सामन्यांत हिंदुस्थानला सहा वेळा पराभव पत्करावा लागला होता.