World Boxing Championship – नूपुरचे पहिले पदक पक्के

हिंदुस्थानच्या नूपुरने आपली विजयाची मालिका कायम ठेवत लिव्हरपूलमध्ये सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी हिंदुस्थानचे पहिले पदक पक्के केले. महिलांच्या 80 किलोवरील गटातील उपांत्यपूर्व फेरीत तिने उझबेकिस्तानच्या ओल्टिनॉय सोतिंबोएव्हा हिचा 4-1 गुणफरकाने पराभव केला.

डावपेचांनी रंगलेल्या या लढतीत नूपुर आणि ओल्टिनॉय या दोघींनाही जास्त पकड केल्याबद्दल प्रत्येकी एक गुण गमवावा लागला. नूपुरने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला, मात्र जागतिक युवा रौप्यपदक विजेती व अस्तानामधील कांस्यपदकविजेती सोतिंबोएव्हा दुसऱ्या फेरीत थोडीशी बरोबरी साधण्यात यशस्वी झाली. तरीही निर्णायक तिसऱ्या फेरीत नूपुरने दमदार हल्ला करत प्रतिस्पर्धीला रोखले आणि उपांत्य फेरीत धडक दिली.

मंगळवारी रात्रीच्या सामन्यांमध्ये तीन हिंदुस्थानी खेळाडू उपांत्यपूर्व फेरी गाठत पदकाच्या जवळ पोहोचले होते. महिलांच्या 48 किलो गटात मीनाक्षीने चीनच्या वांग क्युपिंगला 5-0 ने हरवले. पुरुषांच्या 50 किलो गटात जदुमणीसिंह मंडेंगबमने इंग्लंडच्या रीसे रीडशॉला 5-0 ने पराभूत केले, तर पुरुषांच्या 65 किलो गटात अभिनाश जम्वालने डॉमिनिकन रिपब्लिकच्या पिटर यनोआ फर्नांडो दे जीझसचा धुव्वा उडवला, मात्र पुरुषांच्या 85 किलो गटात जगनूला पराभव पत्करावा लागला. त्याला स्कॉटलंडच्या रॉबर्ट विल्यम मॅक्नल्टीने 5-0 ने हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश नाकारला.