युवा खेळाडूंना सिद्ध करण्याची सुवर्णसंधी; दक्षिण विरुद्ध मध्य विभागात दुलीप करंडकाची अंतिम झुंज आजपासून

दुलीप करंडक आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून  गुरुवारपासून दक्षिण विभाग आणि मध्य विभाग यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात हिंदुस्थानातील स्टार खेळाडू आशिया कपमुळे व्यस्त असल्यामुळे अनेक तरुण खेळाडूंना आपली चमक दाखवण्याची संधी मिळणार आहे. मध्य विभागाचा कर्णधार रजत पाटीदार वगळता इतर कोणताही स्टार खेळाडू अंतिम सामन्यात दिसणार नाही. परिणामतः तरुण खेळाडूंची कामगिरी केंद्रस्थानी राहणार आहे.

स्मरणच्या फलंदाजीकडे लक्ष

कर्नाटकचा रविचंद्रन स्मरण हा या अंतिम सामन्यात विशेष लक्षवेधी ठरू शकतो. त्याने सात प्रथम श्रेणी सामन्यांत 64.50 च्या सरासरीने 516 धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. लिस्ट-ए व टी–20 क्रिकेटमध्येही त्याचा विक्रम उल्लेखनीय आहे. स्मरण या 22 वर्षीय खेळाडूला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर राष्ट्रीय निवड समितीसमोर चमक दाखवण्याची प्रबळ इच्छा आहे.

मालेवारचा पुन्हा वार

मध्य विभागाच्या दानिश मालेवारने याआधीच्या सामन्यांत चमकदार कामगिरी केली आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याने 203 आणि उपांत्य फेरीत 76 धावा केल्या. विदर्भचा हा 21 वर्षीय फलंदाज आजवर 11 प्रथम श्रेणी सामन्यांत 59 च्या सरासरीने 1077 धावा व तीन शतकं ठोकली आहेत. त्याचबरोबर तामीळनाडूचा 19 वर्षीय आंद्रे सिद्धार्थ हाही चर्चेत आहे. त्याने आपल्या प्रथम श्रेणी पदार्पणाच्या हंगामात (2024-25) तब्बल 612 धावा केल्या होत्या, सरासरी 68 अशी होती.

गोलंदाजीत पेच कायम

दक्षिण व मध्य विभागांची फलंदाजी मजबूत असली तरी गोलंदाजी विभागात काही अडचणी आहेत. मध्य विभागाकडून दीपक चहर खेळणार असून तो हिंदुस्थानी संघात पुनरागमनासाठी उत्सुक आहे. मात्र खलील अहमद, यश ठाकूर व हर्ष दुबे हे तिघेही हिंदुस्थान ‘अ’ संघात असल्याने मध्य विभागाला त्यांच्या अनुपस्थितीची उणीव भासेल.

दक्षिण विभागालाही देवदत्त पडिक्कल आणि नारायण जगदीशन यांच्या अनुपस्थितीत खेळावे लागणार आहे.

अंतिम लढतीसाठी संभाव्य संघ

मध्य विभाग    आयुष पांडे, दानिश मालेवार, शुभम शर्मा, रजत पाटीदार (कर्णधार), यश राठोड, उकेंद्र यादव (यष्टिरक्षक), आदित्य ठाकरे, सारांश जैन, दीपक चहर, कुलदीप सेन, कुमार कार्तिकेय सिंह.

दक्षिण विभाग शेख रशीद, तन्मय अग्रवाल,  मोहित काळे, रविचंद्रन स्मरण,  रिकी भुई (उपकर्णधार), आंद्रे सिद्धार्थ/सलमान निजार, मोहम्मद अझहरुद्दीन (कर्णधार व यष्टिरक्षक), तनय त्यागराजन, गुरजापनीत सिंह, वासुकी कौशिक, एमडी निधीश.