
>>संजय कऱ्हाडे
आजच्या सामन्याचं भाकीत करताना बहुश्रुत, ज्ञानवंत अन् विनोदाची मानगूट पकडून अतिशय गंभीरपणे मार्ंनग वॉकला जाणाऱ्या पु. ल. देशपांडे यांचे शब्द उधार घ्यावे लागतायत. त्यांचा अक्षरसंग्रह किंचित बदलून! खरं सांगा, आजच्या सामन्याबद्दल तुम्हाला किती उत्कंठा वाटतेय! आता त्यावरच लिहिणं म्हणजे, विश्वेश्वराच्या घाटीवर उभं राहून ‘गुरू ग्रंथ साहिब’ वाचण्यासारखं नाही का! याचा त्याला उपयोग नाही आणि त्याला याचा. थोडक्यात, कुत्ता जाने न् चमडा जाने…
असो. बांगलादेशचा संघ या स्पर्धेतला पहिलाच सामना खेळतोय आणि हाँगकाँग दुसरा. हाँगकाँगने दोनच दिवसांपूर्वी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून सणसणीत मार खाल्ला. 188 धावांचं आव्हान त्यांना पेलवता आलं नाही. निव्वळ 94 धावांत त्यांचा खुर्दा उडाला. ते मोठय़ा धावसंख्येच्या भाराखाली चिरडले गेले! त्यांच्या क्षेत्रक्षणाबद्दल तर अवाक्षरही नको. लाकडी घाण्यावर बैलाऐवजी स्वतःच गरागरा फिरून आल्याप्रमाणे त्यांनी झेल सोडले. त्यामुळे गोलंदाजी फिकी पडली. त्यातल्या त्यात चौतीस वर्षीय कप्तान यासीम मुर्तुझाने त्याच्या डावऱ्या फिरकीने चकित केलं.
थोडक्यात, पार दमछाकलेला टिंगटाँग, सॉरी, हाँगकाँग आज बांगलादेशला लाल आंख दाखवेल असं काही वाटत नाही.
बांगलादेशकडे लिटन दास, तौहीद हृदोय, शाकिब अल हसन, मुस्तफिजूर, महेदी हसनसारखे नामांकित अन् हरहुन्नरी खेळाडू आहेत. आशिया कपमधील त्यांची कामगिरी फार सातत्यपूर्ण नसली तरी हाँगकाँगच्या संघासमोर बांगलादेशचे खेळाडू आपापला घसा साफ करून सूर पक्का करून घेतील यात वाद नाही.
क्रिकेटचा खेळ अपरंपार अनिश्चिततांनी भारलेला आहे आणि टी-20 च्या हाराकिरीत काहीही घडू शकतं, या उक्तींवर दृढ विश्वास असणाऱ्यांनी आजचा सामना आपापला श्वास रोखून पाहण्यास हरकत नाही!
कोशिश करो, मज़ा आए न आए;
ज़िंदा होने का एहसास हो जाएगा।