दक्षिण विभाग 149 धावांत गारद; मध्य विभागाच्या कार्तिकेय, सारांशने घेतली फिरकी

मध्य विभागाच्या कुमार कार्तिकेय आणि सारांश जैन यांनी दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत दक्षिण विभागाला पहिल्या डावात 63 षटकांत अवघ्या 149 धावांत गुंडाळले. या फिरकीच्या जोडगोळीने  9 विकेट घेत दक्षिण विभागाची फिरकी घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मध्य विभागाने उर्वरित 19 षटकांच्या खेळात बिनबाद 50 धावांपर्यंत मजल मारली होती. दानिश मालेवार 28, तर अक्षय वाडकर 20 धावांवर खेळत होते.

बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दक्षिण विभागाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. दीपक चहर, आदित्य ठाकरे आणि कुलदीप सेन या वेगवान त्रिकुटाने कर्णधार रजत पाटीदारचा निर्णय सार्थ ठरविला. मोहित काळे आणि तन्मय अग्रवाल यांनी सावध फलंदाजी करत 27 धावांची सलामी दिली. मात्र, 16व्या षटकात कार्तिकेयने मोहितला बोल्ड केले. लगेचच स्मरण रविचंद्रनलाही त्याने याच पद्धतीने माघारी धाडले. अग्रवालने (31) सर्वोच्च धावा केल्या, पण तोही धावबाद झाला. कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनला कार्तिकेयने वळण घेतलेल्या चेंडूवर स्वस्तात बाद केले आणि दक्षिण विभागाचा डाव 4 बाद 64 अशा संकटात सापडला.

दुपारनंतर सारांश जैनने गोलंदाजीची धुरा सांभाळत सलग तीन गडी टिपले. रिकी भुईला त्याने पायचींत पकडले. सलमान निझारने कार्तिकेयवर एका षटकात षटकार आणि चौकार ठोकले, तर आंद्रे सिदार्थनेही चौकार लगावला. मात्र, सिद्धार्थला सारांशने यष्टिचीत करून माघारी पाठवले. 24 धावा करणारा निझारही शॉर्ट लेगवर झेलबाद झाला आणि दक्षिण विभागाचा डाव 7 बाद 116 असा गडबडला. खालच्या फळीतील फलंदाज टिकू शकले नाहीत. कार्तिकेयने गुरजनप्रीतला बाद केले, तर सारांशने एम.डी. निधीश आणि अंकित शर्माला बाद करत 5 विकेट पूर्ण केले.

प्रत्युत्तरादाखल मध्य विभागाने आत्मविश्वासाने पहिल्या डावाचा प्रारंभ केला. दानिश मालेवार आणि अक्षय वाडकर यांनी नियमित चौकार ठोकले. गुरजनप्रीतच्या एका षटकात तीन चौकार आले. अंकित शर्मा, निधीश आणि वासुकी कौशिक यांनी टप्प्याटप्प्याने गोलंदाजी केली, मात्र, सलामीवीरांनी अर्धशतकी भागीदारी रचत दक्षिण विभागाची गोलंदाजी निष्प्रभ ठरविली.

संक्षिप्त धावसंख्या

दक्षिण विभाग  149 (तन्मय अग्रवाल 31, सलमान निझार 24; सारांश जैन 5-49, कुमार कार्तिकेय 4-53) मध्य विभाग 50/0 (मालेवार ना. 28 , वाडकर ना. 20)