मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांचे पंख कापले; सहपालकमंत्र्यांना तक्रारी सोडवण्याचे अधिकार, अठरा महिन्यानंतर सोपवली जबाबदारी

महायुती सरकारमध्ये सध्या शह-काटशह यांचे राजकारण सुरू आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन जिह्यांच्या सहपालकमंत्र्यांची तब्बल आठ महिन्यांनंतर जबाबदारी निश्चित केली आहे. शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मकरंद पाटील आणि भाजपचे आशीष शेलार या तीन पालकमंत्र्यांच्या जिह्यातील तक्रारी सोडवण्याची जबाबदारी सहपालकमंत्र्यांवर सोपवून पालकमंत्र्यांना लगाम घातल्याची चर्चा आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई उपनगर, कोल्हापूर आणि बुलढाणा या तीन जिह्यांसाठी सहपालकमंत्री नेमले आहेत. राज्यात  सहपालकमंत्री नेमण्याची प्रथा 2014 पासून सुरू झाली. जानेवारी महिन्यात मुंबई उपनगर जिह्यासाठी मंगल प्रभात लोढा  आणि कोल्हापूर जिह्यासाठी माधुरी मिसाळ यांना  सहपालकमंत्री नेमण्यात आले होते. अलीकडच्या काळात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना बुलढाणा जिह्याचे सहपालकमंत्री करण्यात आहे.

मात्र, आतापर्यंत या सहपालकमंत्र्यांची विवक्षित जबाबदारी निश्चित झाली नव्हती. त्यामुळे  सरकारदरबारी सहपालकमंत्र्यांच्या कामाबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे तब्बल आठ महिन्यांनंतर सरकारने सहपालकमंत्र्यांची जबाबदारी स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी नेमून दिलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा करण्याचे काम सहपालकमंत्र्यांवर सोपविण्यात आले आहे.

शिंदे आणि अजितदादा गटालाही शह

या निर्णयाने मुंबई उपनगर जिह्याचे सहपालकमंत्री असलेले  मंगल प्रभात लोढा यांची जबाबदारी निश्चित झाली आहे. कोल्हापूर जिह्यात शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर, तर बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मकरंद जाधव-पाटील पालकमंत्री आहेत. सहपालकमंत्र्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून मुख्यमंत्र्यांनी एक निर्णयात स्वतःच्या पक्षासह शिंदे गट व अजित पवारांच्या गटालाही शह दिल्याची राजयकीय वर्तुळात चर्चा आहे.