एसटीची स्मार्ट कार्ड योजना ‘ब्रेकडाऊन’..कंडक्टर-प्रवाशांमध्ये रोजच वादाची ठिणगी; नवीन कंपनीची नेमणूक करूनही लटकालटकी

ब्रेकडाऊन झालेली स्मार्ट कार्ड योजना पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठी एसटी महामंडळाने इबिक्स कंपनीशी करार केला आहे. मात्र या कंपनीच्या खटारा कारभारामुळे ही योजना लटकली आहे. त्यातच सवलतीचा प्रवास करताना दाखवले जाणारे आधार किंवा अन्य पुरावे बोगस असल्याचा संशय येत असल्याने अनेकदा कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वादाची ठिणगी पडत असून सवलतीचा प्रवास नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी 2019 मध्ये एसटीने स्मार्ट कार्ड योजना सुरू केली होती. मात्र ट्रायमॅक्स कंपनीशी केलेला करार नूतनीकरण करण्यात न आल्यामुळे चार वर्षांपासून ही योजना ठप्प आहे. दरम्यान महामंडळाने आता इबिक्स कंपनीशी नवा करार केला आहे. परंतु या कंपनीचेही सॉफ्टवेअर अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. त्यामुळे कोट्यवधींच्या मशिनरी धूळखात पडल्या असून प्रवाशांना पुन्हा आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा कागदी पास दाखवूनच प्रवास करावा लागत आहे. मात्र अनेकदा प्रवाशांकडून दाखवल्या जाणाऱ्या पुराव्यांवरून वादंग होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

पालघरमध्ये 13 हजार कार्ड
पालघर जिल्ह्यात एकूण 13 हजार 648 स्मार्ट कार्ड जारी करण्यात आले होते. त्यातील बहुतेक कार्ड बंद अवस्थेत आहेत. स्मार्ट कार्ड योजनेसाठी 6 लाख 82 हजार 400 रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र प्रवाशांना त्याचा लाभ न मिळाल्याने ही योजना डिसेंबर 2022 बंद करण्यात आली. एसटी महामंडळाने पुन्हा तातडीने पावले उचलून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

कुणाला किती सवलत ?
50 इयत्ता 5 वी ते 12 वी विद्यार्थिनींना 100 टक्के सवलत, विद्यार्थी मासिक पास – 66. 67 टक्के सवलत, शैक्षणिक सहली 50 टक्के सवलत, शैक्षणिक स्पर्धा टक्के सवलत, राज्य शासन पुरस्कृत खेळातील विजेते -33.33 टक्के सवलत, रेस्क्यू होम मुलांना सहलीसाठी – 66.67 टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिक (65 वर्षांवरील) -50 टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिक (75 वर्षांवरील) – 100 टक्के सवलत, दुर्धर रग्णांना 75 टक्के सवलत, एचआयव्ही, सिकलसेल, डायलिसिस रुग्ण – 100 टक्के सवलत, अंध व्यक्ती-75 टक्के सवलत, आमदार, खासदार 100 टक्के सवलत