नवी मुंबईतील अडीच हजार हरकतींवर नऊ तास सुनावणी, आता लक्ष अंतिम प्रभाग रचनेकडे

नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत बदल करण्यासाठी नागरिकांनी घेतलेल्या हरकतींवर आज निवडणूक आयोगाने सुनावणी घेतली. प्रभाग रचनेवर सुमारे 2 हजार 551 हरकती घेण्यात आल्या असल्याने ही सुनावणी तब्बल नऊ तास चालली. सुनावणी संपल्यानंतर आता इच्छुकांचे लक्ष अंतिम प्रभार रचनेकडे लागले आहे.

नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रथम चार सदस्यीय प्रभागातून होत आहे. भौगोलिक रचनेनुसार काही भाग एकाच प्रभागात येणे आवश्यक होते. मात्र शहराच्या उदयापासून एकसंघ असलेले हे परिसर तोडण्यात आले आहेत. परिणामी या प्रभाग रचनेवर हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला आहे. या हरकतींवर वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात निवडणूक आयोगाने आज सुनावणी घेतली. ही सुनावणी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आणि नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. 28 प्रभागांच्या रचनेवर सकाळी 10 वाजता सुरू झालेली सुनावणी रात्री 8 वाजता संपली. या सर्व प्रभागातून एकूण 111 नगरसेवक निवडून जाणार आहेत. 24 प्रभाग हे प्रत्येकी चार सदस्यीय असणार असून एक प्रभाग हा तीन सदस्यीय असणार आहे.

सर्वाधिक हरकती नेरुळ गावातून
नवी मुंबईत पालिका प्रशासनाने एकूण 28 प्रभाग तयार केले आहेत. या प्रारूप प्रभाग रचनेवर सर्वाधिक हरकती नेरुळ गावातून घेण्यात आल्या आहेत. नेरुळ गावाची विभागणी प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये करण्यात आली आहे. एक प्रभाग थेट सीवूडला जोडण्यात आला आहे. भौगोलिक रचनेनुसार नेरुळ गावाचा समावेश एकाच प्रभागात करण्यात यावा, या मागणीसाठी स्थानिक रहिवाशांनी हरकतींचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.