
कल्याण-डोंबिवली महापालिकेची प्रस्तावित निवडणूक वादात सापडली आहे. निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना घेण्यासाठी आज केडीएमसी मुख्यालयात सुनावणी पार पडली. प्रभाग रचनेविरोधात तब्बल 3906 हरकती आल्या होत्या. यातील 3642 हरकती या 27 गावांमधून होत्या. आमची स्वतंत्र पालिका करा या मागणीसाठी 27 गावांतील नागरिक यावेळी आक्रमक झाले होते. 27 गावे वगळून केडीएमसीची प्रभाग रचना जाहीर करा अन्यथा कोर्टात जाण्याचा इशारा यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दिला.
प्राधिकृत अधिकारी दीपेंद्र कुशवाह आणि महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत ही सुनावणी झाली. पालिकेने सुरुवातीला केवळ 264 हरकती प्राप्त झाल्याची माहिती दिली होती. परंतु हरकती आणि सुनावणीदरम्यान हा आकडा तब्बल चार हजारच्या पुढे गेला. 27 गावांमधूनच प्रभाग रचनेवर तब्बल 3 हजार 642 हरकती घेण्यात आल्या. खासदार सुरेश म्हात्रे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी निवडणूक आयोगाकडे हरकतीसंदर्भातील वस्तुस्थितीजन्य अहवाल पाठवण्याची मागणी यावेळी प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे केली. वही प्रभाग रचना फिक्सिंग करून काही पक्षातील लोक निवडून यावेत आणि इतर पक्षातील लोक आपल्या पक्षात यावेत यासाठी करण्यात आल्याचा आरोप दीपेश म्हात्रे यांनी केला. तर 27 गावातील ग्रामस्थांना महापालिकेने योग्य सुविधा नाहीत. त्यामुळे या गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी खासदार सुरेश म्हात्रे यांनी केली. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक तात्या माने, काँग्रेसचे संतोष केणे, मनसेचे प्रकाश भोईर, श्रीनिवास घाणेकर यांच्यासह 27 गावांतील सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रशासनाने सरकारचे नियम सोडून सत्ताधाऱ्यांचे नियम पाळले आहेत. त्यामुळे आमचा या प्रभाग रचनेला ठाम विरोध आहे. त्याचबरोबर 27 गावे महापालिकेतून वगळण्यासाठी गावकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेला आमचा जाहीर पाठिंबा आहे. – दीपेश म्हात्रे, कल्याण जिल्हाप्रमुख
27 गावांच्या स्वतंत्र पालिकेसंदर्भात सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असतानाही महापालिकेने 27गावांसह प्रभाग रचना केली. त्यामुळे पुढे मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. प्रशासनाने वेळीच निवडणूक आयोगाला याबाबतची कल्पना द्यावी. – सुरेश म्हात्रे, खासदार