
Asia Cup 2025 मध्ये टीम इंडियाचा दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध दुबईमध्ये खेळला जाणार आहे. परंतु हा सामना सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पहलगाम हल्ल्यात धर्म विचारून निष्पाप नागरिकांचा खून करण्यात आला. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणवापूर्ण स्थिती आहे. त्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला जात आहे. अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंगने या सामन्यावरून मोठं वक्तव्य करत सामन्याला विरोध दर्शवला आहे.
हरभरजन सिंग मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाला होता. तेव्हा तो म्हणाला की, “हिंदुस्थान-पाकिस्तान सामना नेहमीच चर्चेमध्ये असतो. परंतु ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वांचचं म्हणण आहे की, पाकिस्तानसोबत क्रिकेट आणि व्यापार करू नये. आम्ही World Championship of Legends मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलो नाही. प्रत्येकाचे स्वत:चे मत असते. परंतु माझ्या मते दोन्ही देशांमधील संबंध सुधारेपर्यंत क्रिकेट आणि व्यापार होऊ नये. असं माझं मत आहे. सरकार म्हणत आहे की जर सामना होऊ शकतो तर, तो झाला पाहिजे. पण दोन्ही देशांमधील संबंधही सुधारले पाहिजेत.” अशी भुमिका हरभजन सिंगने मांडली असून त्याने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकारच दिला आहे.
पूर्वीसारखी सध्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याची चर्चा होताना दिसत नाहीये. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण परिस्थीतीमुळे हिंदुस्थानच्या अनेक माजी खेळाडूंनी तसेच चाहत्यांनी सुद्धा पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. याचा सामन्याच्या तिकीट विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. कारण हिंदुस्थान-पाकिस्तान सामना म्हटलं की काही तासातच तिकीटांची विक्री व्हायची आणि स्टेडियम खचाखच भरायचं. परंतु रविवारी होणाऱ्या सामन्याच्या तिकीट अजूनही म्हणाव्या तशा विकल्या गेलेल्या नाहीयेत.