
हिंदुस्थानी हवाई दलाला पुढच्या दोन महिन्यांत म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत दोन तेजस मार्क-1 फायटर जेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) नोव्हेंबरमध्ये दोन तेजस मार्क-1ए लढाऊ विमाने देणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. अमेरिकन संरक्षण कंपनी जीई एरोस्पेसकडून एक जेट इंजिन मिळाले असून दुसरे इंजिन या महिन्याच्या अखेरीस मिळेल. त्यामुळे हिंदुस्थानी लष्कराची पॉवर आणखी वाढणार आहे.
काय आहेत नव्या जेटची वैशिष्टय़े…
एलसीए मार्प 1एमध्ये एईएसए रडार आहे. या रडारची रेंज जुन्या तेजस विमानांपेक्षा जास्त आहे. यामध्ये हवेत इंधन भरण्याची क्षमता आहे. त्यामुळे सिंगल इंजिन लढाऊ विमानांची श्रेणी वाढण्यास मदत होईल. यामध्ये एपूण 40 सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या विमानाची देखभाल करणे सोपे होईल. यामध्ये अपग्रेडेड रडार वार्ंनग रिसिव्हर सिस्टम बसवण्यात आली आहे. यामुळे विमानाला धोके लवकर ओळखता येतात. यामध्ये डिजिटल मॅप जनरेटर, स्मार्ट मल्टि फंक्शन डिस्प्ले आणि अत्याधुनिक रेडिओ मल्टिमीटर बसवली आहेत.
केंद्र सरकारने 2021 मध्ये 83 तेजस मार्प-1ए खरेदी करण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सोबत 48 हजार कोटी रुपयांचा करार केला होता, परंतु अमेरिकन इंजिनांच्या वितरणात विलंब झाल्यामुळे एचएएलला अद्याप एकही विमान मिळू शकलेले नाही. 2028 पर्यंत एचएएल सर्व विमाने हवाई दलाला सोपवेल अशी अपेक्षा अनेक दिवसांपासून केली जात आहे. एलसीए मार्प 1ए हे तेजस विमानाचे अत्याधुनिक जेट विमान आहे. या विमानामध्ये एव्हियोनिक्स आणि रडार सिस्टम अपग्रेड केल्या आहेत. एलसीए मार्प-1एमधील 65 टक्क्यांपेक्षा जास्त उपकरणे हिंदुस्थानात बनविली जातात. तेजसदेखील एचएएलने विकसित केले आहे. हे एकल-इंजिन हलके लढाऊ विमान आहे. मागील महिन्यात केंद्र सरकारने 97 एलसीए मार्प 1ए लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी 62 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तेजस विमान एकाच वेळी 3 हजार किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकते. तेजसचा वेग प्रतितास 2205 आहे. तेजस 50 हजार फूट उंचीवरून उड्डाण करू शकते.
एचएएलकडे 83 विमाने देण्यासाठी 2028 पर्यंतचा कालावधी आहे. जेट विमानांच्या डिलिव्हरीमध्ये झालेल्या विलंबासाठी उद्योगाला जबाबदार धरले जात होते, परंतु हा विलंब तांत्रिक दोषामुळे झाला आहे. आता तो दूर करण्यात आला आहे, असे एचएएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी. के. सुनील यांनी सांगितले.