
माजी फिरकीवीर हरभजन सिंगने येत्या 14 सप्टेंबरला दुबईत होणाऱ्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यापूर्वी थेट भूमिका घेतली आहे. भज्जीने स्पष्ट शब्दांत सांगितले, दोन्ही देशांतील संबंध सुधारले नाहीत तोवर क्रिकेट आणि व्यापारही नको. पण हे त्याचे वैयक्तिक मत असल्याचे त्याने स्पष्ट केले.
या वर्षीच्या सुरुवातीला पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत प्रत्युत्तर दिले. या घडामोडीनंतर हिंदुस्थान-पाक संबंध युद्धाच्या उंबरठय़ावर पोहोचले होते. मात्र आता दोन्ही संघ फक्त बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दोन महिन्यांपूर्वी दिग्गज क्रिकेटपटूंच्या झालेल्या सामन्यात हिंदुस्थानी संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देत जेतेपदावर पाणी सोडले होते. तेव्हाही हरभजनने आपले मत परखडपणे मांडले होते. आजही त्याचा सूर तसाच होता. तो म्हणाला, हिंदुस्थान-पाक सामना नेहमीच चर्चेत असतो. पण ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर क्रिकेट आणि व्यापार थांबायला हवा, असं सगळ्यांचं मत होतं. मी स्वतः मानतो की, संबंध सुधारेपर्यंत ना क्रिकेट, ना व्यापार.
सरकारचा अंतिम निर्णय
केंद्र सरकारने नुकताच आगामी ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद मिळवण्यासाठी पाकिस्तानविरुद्ध बहुराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यास बीसीसीआयला हिरवा पंदील दाखवला आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध फक्त द्विपक्षीय मालिकेत खेळणार नाही. केंद्र सरकारने पाकिस्तान युद्धाच्या लढतींना परवानगी दिली असली तरी देशभर या लढतीला विरोध केला जात आहे. तशीच विरोधाची भूमिका हरभजनही व्यक्त केलीय. ही त्याची वैयक्तिक भूमिका आहे. मात्र सरकार जर म्हणत असेल की सामना खेळला पाहिजे तर मग तो व्हायलाच हवा.