अर्शदीप सिंगला वगळणे नित्याचेच, अश्विनची संघ व्यवस्थापनावर टीका

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा अर्शदीप सिंग आशिया चषक स्पर्धेत पहिल्या सामन्यात बाकावर बसणे हा चर्चेचा विषय आहे. मात्र गौतम गंभीर यांनी मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अर्शदीपला वगळणे ही नवीन गोष्ट राहिलेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीतही खेळपट्टी कोरडय़ा असतानाही मुख्य प्रशिक्षकांनी मध्यमगती गोलंदाजाकडे गेले. तेथे अर्शदीपला खेळवता आले असते, असे मत हिंदुस्थानचा माजी फिरकीपटू आर. अश्विन याने व्यक्त केले. हाच प्रकार टी-20 विश्वचषक स्पर्धेपर्यंत पाहणार आहोत, असेही तो म्हणाला.

आशिया चषक स्पर्धेची हिंदुस्थानने दणक्यात सुरुवात केली. पहिल्या सामन्यात हिंदुस्थानने यूएईचा दारुण पराभव केला, मात्र या सामन्यात हिंदुस्थानचा प्रमुख जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग बाकावर बसल्याने चर्चेला उधाण आले. टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला बाकावर बसवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अश्विन म्हणाला, यूएईविरुद्धच्या सामन्यात हिंदुस्थानला अतिरिक्त फलंदाज खेळवण्याची गरज नव्हती. प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न मिळाल्याने अर्शदीपही नाराज झाला असेल. गंभीर आणि सूर्यपुमार यादव हे प्लेइंग इलेव्हनमध्ये अतिरिक्त फलंदाजाचा विचार करत आहेत, मात्र यूएईसारख्या संघाविरुद्ध अतिरिक्त फलंदाजाची गरज आहे का? याचा विचार केला पाहिजे. अर्शदीपने सर्व ठिकाणी चांगली कामगिरी केली आहे. हिंदुस्थानने जिंकलेल्या टी-20 विश्वचषकातही त्याने उत्पृष्ट कामगिरी केली होती. संघात एक मध्यमगती गोलंदाज ठेवण्याची रणनीती मला मान्य नाही. हिंदुस्थानने आणखी एक वेगवान गोलंदाज खेळवायला हवा, असे अश्विन म्हणाला.