‘सौरभ गांगुलीचा अनुभव प्रिटोरियाला उभारी देईल – अॅलन डोनाल्ड

हिंदुस्थानचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीची प्रथमच एसए टी-20 लीगमध्ये प्रशिक्षक म्हणून एंट्री होत आहे. येत्या डिसेंबरमध्ये रंगणाऱ्या चौथ्या हंगामात तो ‘प्रिटोरिया कॅपिटल्स’चा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.

या नव्या भूमिकेवर बोलताना दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्ड म्हणाला, सौरभकडे क्रिकेटची अद्वितीय जाण आणि अफाट अनुभव आहे. त्यामुळे संघाला कठीण प्रसंगातून बाहेर काढणे त्याच्यासाठी अवघड जाणार नाही. प्रिटोरिया कॅपिटल्स या हंगामात धमाल कामगिरी करेल याची खात्री आहे.

प्रिटोरियाची मोठी अपेक्षा

आम्हाला स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले दिसतील. प्रिटोरियाच्या लोकांच्या अपेक्षा प्रचंड आहेत. त्यामुळे सौरभवर दबाव नक्कीच असेल, पण तो नेहमीच उत्तम योजना घेऊन येतो. त्याच्या नेतृत्वामुळे संघाला निश्चितच फायदा होईल, असेही डोनाल्ड म्हणाला.