
अबुधाबीत हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तानचा क्रिकेट सामना होणार आहे. यावरून देशभक्तीचा हा व्यापार सुरू आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच बाळासाहेबांवर आरोप करणाऱ्या सर्व भाजपच्या लोकांनी औकातीत रहावं, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज एका उद्विग्न भावनेतून आणि विषण्ण मनाने मी आपल्याशी बोलत आहे. उद्या अबुधाबीत हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार आहे. मी उद्विग्न आणि विषण्ण हे शब्द यासाठी वापरले की, पहलगामध्ये जो हल्ला आपल्या भारतीयांवर झाला. त्यात पर्यटकांची हत्या करण्यात आली त्यांचे रक्त सुकलेले नाही त्याच्या जखमा अजून भरल्या नाहीत. त्यानंतर आपल्याला सर्व भारतीयाना असं वाटत होतं की आपण आता पाकिस्तानचे चार पाच तुकडे करून टाकू. त्या दृष्टीने एक चढाई आणि एक युद्धही केलं गेलं. त्याला नाव दिलं गेलं ऑपरेशन सिंदूर. मधल्या काळात आपल्या संरक्षणंमंत्र्यांनी सांगितलं की अजूनही ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. एकूणच जे काही वातावरण होतं ते काही आपल्याला नवीन नाहीये. कारण थोड्या दिवसांनी किंवा काही वर्षांनी पाकिस्तान हा आपल्या देशावर दहशतवादी हल्ला करतं, त्यावेळेला आपण उठून जागे होते, सरकारही चवताळून उठतं. आपले सैनिक शौर्य गाजवताता आणि याही वेळी ज्या बातम्या येत होत्या. पाकिस्तान जणू काही आपण पादाक्रांत करत आहोत अशा स्वरूपाच्या या बातम्या होत्या. सैनिकांनी तर शौर्यानी परिसीमा गाठली होती. अचानक काय झालं कुठून कळ फिरली, ट्रम्प म्हणाले की, त्यांनी व्यापारासाठी युद्ध थांबवलं. त्याचा सुमारास आपल्या देशाचे नाव भाला फेकणाऱ्या नीरज चोप्राने एक पाकिस्तानी प्रशिक्षक आपल्या देशात बोलावलं होतं. पण त्या नीरज चोप्राला अंधभक्तांनी देशद्रोही म्हणण्यापर्यंत मजल गाठली होती. नीरजला याचा काय मनस्ताप झाला असेल याची मला कल्पनाही करता येत नाही. पण आता अचानक असं काय झालं की पाकिस्तानबरोबर आपण युद्ध पुकारलं होतं आणि त्याच पाकिस्तानसोबत आता आपण क्रिकेट मॅच खेळत आहोत. तुम्हा सगळ्यांचा कल्पना आहे, की ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवली होती, आमची लढाई दहशतवादाविरोधात आहे आणि आमच्या देशात पाकिस्तान दहशत पसरवत आहे हे जगाला सांगण्यासाठी हे शिष्टमंडळ पाठवण्यात आलं होतं. आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे. मला वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे. थट्टा नव्हे तर देशभक्तीचा हा व्यापार सुरू आहे. यांना व्यापारापुढे देशाचीही किंमत राहिलेली नाही. अमित शहा आणि राजनाथ सिंह यांना मी प्रश्न विचारणार आहे की तुम्ही यांना थांबवणार आहात का? जे जे नीरज चोप्राला देशद्रोही म्हणाले होते, अगदी आपल्या सोफिया कुरेशी यांनाही गधडे आणि नालायक अंधभक्तांनी पाकिस्तानची बहीण म्हणाले होते. त्या गधड्यांचे काय करणार? पाकिस्तानबद्दल आपली भूमिका तरी काय आहे? म्हणजे तुम्ही जे करणार ते आम्ही सगळं गपगुमान मान्य करायचं. तुम्ही जेव्हा म्हणाल की पाकिस्तान मुर्दाबाद म्हणायचं तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्ही पाकिस्तानला मिठ्या मारायच्या. जवान तिथे लढणार आणि शहीद होणार, आपले नागरिक ज्यांना धर्म विचारून. हिंदू म्हणून गोळ्या घातल्या होत्या, तर भाजपच्या लेखी पंतप्रधानांच्या लेखी देशाची आणि हिंदुत्वाची काही किंमत आहे की नाही? का हिंदुत्वापेक्षाही आणि देशापेक्षाही त्यांना व्यापार मोठा वाटतोय हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. आणि असं काही नाहिये. ते म्हणाले होते ना की खून और पाणी एकसाथ बह नही सकता. एखाद्या खेळावर आपण बहिष्कार टाकला तर याचा अर्थ नाही होत की आपण जागतिक संकट ओढवून घेत आहोत, अजिबात असे नाहिये. यापूर्वी सुद्धा अशा घटना घडल्या आहेत. ही एक मोठी संधी आहे ज्यात पंतप्रधानांना जगभरात शिष्टमंडळ पाठवून जे जमलं नाही, ते एका सामन्यावर बहिष्कार टाकून आपण आतंकवादाच्या विरोधात आहोत हे आपण दाखवून दिलं असतं. आमच्या देशात पाकिस्तान दहशतवाद पसरवतोय, आण जोवर पाकिस्तान या कारवाया थांबवत नाही तोवर आम्ही पाकिस्तानसोबत पाणीच काय कुठलेही संबंध ठेवणार नाही. हीच भूमिका शिवसेना प्रमुखांची होती. मला आठवतंय की जावेद मियाँदाद जेव्हा इथे आला होता, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं होतं की ही सर्व फाल्तुगिरी बंद कर, जोवर पाकिस्तान आमच्याशी नीट वागत नाही, तोपर्यंत माझ्या देशात क्रिकेट होऊ देणार नाही. आज मला खरोखर सुषमा स्वराज यांची आठवण येत आहे, आता परराष्टमंत्री जयशंकर आहेत. हे जयशंकर स्वराज यांचे सचिव होते. सरदार पटेल हे पंतप्रधान हवे होते असं म्हटलं जातं. मला वाटतं पटेल आज पंतप्रधान हवे होते, कारण आज पटेल असते तर आज पाकिस्तान शिल्लक राहिला नसता आणि पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा प्रश्नच निर्माण झाला नसता. तुमच्या माध्यमातून मी तमाम देशवासियांना मी आवाहन करत आहे की, उद्या शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करत आहोत. घर घर सिंदूर ही मोहीम भाजपवाले राबवणार होते, त्याचा तीव्र निषेध झाल्यानंतर त्यांना ही मोहीम मागे घ्यावी लागली. आता हर घरसे सिंदूर हा मोदींना पाठवले पाहिजे. उद्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या चौकात जमतील आणि एका मोठ्या डब्यात कुंकू टाकतील आणि हे सर्व डबे राज्यातून मोदींनी पंतप्रधान कार्यालयातून पाठवल्या जातील. मोदींनी हे दमदारपणे हे सांगितलं पाहिजे की हा सामना होणार नाही. विक्रोळीत भाजप मराठी दांडिया आयोजित करणार आहे, मी आतापर्यंत गुजराती लेझिम ऐकलं नाही. आणि भाजप या मराठी दांडियाची थीम ही ऑपरेशन सिंदूरवर ठेवणार आहे. पहलगामध्ये आपल्या माता भगिनींचे सौभाग्य उजाडलं गेलं, ते दृश्य जी आपण पाहिली ती आपल्या डोळ्यासमोरून हलत नाहिये. त्यांचा आक्रोश आजही आपल्या कानांत घुमतोय. आणि हे निर्लज्ज देशभक्तीच्या नावाने सिंदूर वाटप करत आहेत, दांडिया आयोजित करत आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे पूर्वी हिंदुस्थान पाकिस्तान मॅच होत असेल तेव्हा लगेच तिकीट विक्री व्हायची आणि आजपर्यंत अशी बातमी आहे की म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाहिये. मग मला मोदींना प्रश्न विचारायचा आहे की, तुमचे आंडू पांडू लोक बसले आहे. नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोही म्हणाले होतात तर जय शहासुद्धा देशद्रोही आहे का? याचे उत्तर आम्हाला पाहिजे. जे लोक उद्या मॅच पहायला जात असेल ते देशद्रोही आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करण्याची भाजपची औकात आहे का? भाजपने औकातीत रहावं असे उद्धव ठाकरे म्हणाले. हा शब्द मी जाणीवपूर्क आणि मुद्दाम वापरतोय. कारण बाळासाहेब ठाकरे जावेद मियाँदादच्या घरी गेले नव्हते जसे मोदीजी नवाझ शरीफच्या घरी गेले होते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि केक खाऊन आले तसे बाळासाहेब गेले नव्हते. तेव्हा बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की हिंदुस्थान पाकिस्तान मॅच होऊ देणार नाही आणि ते होऊ दिलं नव्हतं. बाळासाहेबांवर आरोप करण्यापूर्वी सर्व भाजपच्या लोकांनी औकातीत रहावं असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.