
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर दौऱ्यावर आहेत. मणिपूरमध्ये 2023 पासून हिंसाचार सुरू आहे. या गेल्या दोन वर्षात मोदींनी अनेकदा विदेश दौरे केले. पण एकदाही मणिपूरला जाण्याची त्यांची इच्छा झाली नाही. यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर अनेकदा टीका केली. आता दोन वर्षांनी मणिपूरला गेलेल्या पंतप्रधानांच्या या दौऱ्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान मणिपुरात 3 तास थांबणार आहेत. त्यांची ही विश्रांती संवेदनशीलता नसून तेथील लोकांचा अपमान आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.
मणिपूरच्या नावातच ‘मणि’ आहे! 3 वर्षांपासून धगधगणाऱ्या मणिपूरमध्ये पहिल्यांदाच पोहोचले मोदी, म्हणाले…
मल्लिकार्जुन खरगे यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर हल्लाबोल केला आहे. मणिपूरमधील इम्फाळ आणि चुराचंदपूरमधील तुमचा रोड शो हा खरं तर तेथे राहणाऱ्या लोकांच्या दुःखापासून पळून जाण्याचा प्रयत्न आहे. गेल्या 864 दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. यामध्ये सुमारे 300 लोक मारले गेले, 67 हजार लोक बेघर झाले आणि 1500 हून अधिक लोक जखमी झाले, असे खरगे म्हणाले.
.@narendramodi ji
Your 3-hour PIT STOP in Manipur is not compassion — it’s farce, tokenism, and a grave insult to a wounded people.
Your so-called ROADSHOW in Imphal and Churachandpur today, is nothing but a cowardly escape from hearing the cries of people in relief camps!…
— Mallikarjun Kharge (@kharge) September 13, 2025
गेल्या दोन वर्षांत पंतप्रधानांनी 46 विदेश दौरे केले, परंतु मणिपूरच्या जनतेला शोक व्यक्त करण्यासाठी ते एकदाही आले नाहीत. ‘पंतप्रधानांचा शेवटचा मणिपूर दौरा जानेवारी 2022 मध्ये फक्त निवडणूक प्रचारासाठी होता, असा आरोप यावेळी खरगे यांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून केला आहे.
पंतप्रधानांच्या ‘डबल इंजिन सरकारने’ मणिपूरमधील निष्पाप लोकांचे जीवन पायदळी तुडवले आहे, असे खरगे म्हणाले. पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अपयश आणि सर्व समुदायांशी केलेला विश्वासघात लपवण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. परंतु हिंसाचार अजूनही सुरूच आहे, असा आरोपही खरगेंनी केला.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पूर्वी राज्यातील भाजप सरकारकडे होती आणि आता ती केंद्र सरकारकडे आहे, परंतु दोन्ही सरकार यात अपयशी ठरले आहेत, असा हल्लाबोल खरगे यांनी केला आहे.
हा दौरा नाही तर एक स्वतःसाठी केलेला एक भव्य स्वागत समारंभ
मणिपूरमधील मोदींचा हा दौरा पश्चात्ताप किंवा अपराध नाही, तर स्वतःसाठी केलेला एक भव्य स्वागत समारंभ आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या मूलभूत संविधानिक जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. ‘आता तुमचा राजधर्म कुठे आहे?’ असा परखड सवालही मल्लिकार्जुन खरगेंनी यावेळी उपस्थित केला आहे.