‘मविप्र’च्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ; विद्यापीठ मंजूर, नामंजूरच्या घोषणा

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सर्वसाधारण सभेत स्वायत्त विद्यापीठ स्थापनेच्या विषयावरून अभूतपूर्व गोंधळ झाला. अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी सभागृहात हा विषय नामंजूर केला. सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे यांनी सभागृहाबाहेर प्रतिसभा घेऊन मंजुरी दिली.

मविप्र या अग्रगण्य शैक्षणिक संस्थेची रविवारी स्वर्गीय तुकाराम रौंदळ सभागृहात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्ष ऍड. सुनील ढिकले यांनी सुरुवातीच्या सात विषयांना सर्वानुमते मंजुरी दिली. संस्थेचे स्वायत्त विद्यापीठ स्थापन करण्याचा विषय सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे व त्यांच्या समर्थक संचालकांनी रेटला, मात्र या विषयाला सभासदांचा विरोध असल्याचे सांगत अध्यक्ष ढिकले यांनी हा विषय नामंजूर करताच अभूतपूर्व गोंधळ उडाला. ऍड. ढिकले, माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या समर्थक सभासद व माजी संचालकांनी व्यासपीठावर धाव घेतली, नामंजूरच्या जोरदार घोषणा दिल्या. ठाकरे यांचे विद्यमान सत्ताधारी संचालक व पदाधिकारी यांनी मंजुरीच्या घोषणा देत सभागृह सोडले. संस्थेच्या प्रांगणात ठाकरेंसह सत्ताधारी संचालक, सभासद समर्थकांनी प्रतिसभा घेऊन विद्यापीठ स्थापण्याचा विषय मंजूर केला.

पिस्तुलाने दहशतीचा आरोप

अध्यक्ष सुनील ढिकले यांचा समर्थक असलेला एक सभासद सभा सुरू असताना कमरेला पिस्तूल लावून व्यासपीठावर हजर होता. त्या पिस्तुलाने तो सभासदांवर दहशत निर्माण करीत होता, असा आरोप करणारी फोटोसह पोस्ट नितीन ठाकरे यांनी सायंकाळी फेसबुकवर व्हायरल केली. यामुळे खळबळ उडाली आहे.