अपहरण झालेल्या ट्रक चालकाचा हेल्पर सापडला पूजा खेडकर यांच्या घरात, आई मनोरमा खेडकरविरोधात गुन्हा दाखल

शनिवारी ऐरोली येथे झालेल्या अपघातानंतर कथितरीत्या पळवून नेण्यात आलेल्या 22 वर्षीय ट्रक मदतनीसाची पोलिसांनी सुटका केली. अपहरण झालेला हा हेल्पर माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरच्या घरी सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.

शनिवारी पीडित प्रल्हाद कुमार, मिक्सर ट्रकच्या चालकासोबत होता. या ट्रकची मुलुंड-ऐरोली रस्त्यावरच्या ऐरोली सिग्नलजवळ एका कारला हलकीच धडक लागली. पोलिसांच्या मते, त्या कारमधील दोन व्यक्तींनी ट्रकचालक चंदकुमार चव्हाण याला अडवले आणि त्याच्यासोबत कुमारलाही जवळच्या पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याचा आग्रह धरला.

पोलिसांनी सांगितले की त्या दोघांनी कुमारला जबरदस्तीने त्यांच्या कारमध्ये बसवले आणि चव्हाणला त्यांच्या मागे येण्यास सांगितले. काही वेळानंतर चव्हाणने कुमारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे फोन रिसीव्ह झाले नाहीत. शंका आल्याने त्याने परिसरात शोध घेतला, परंतु कुमार न सापडल्याने त्याने शेवटी ट्रक मालक आणि काँक्रीट वाहतूक व्यवसाय करणारे विलास धोंडीराम देंगरे (53) यांना कळवले. देंगरे यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला गेला.

पोलिस तपासादरम्यान त्या कारचा ठावठिकाणा पुण्यात लागला. नवी मुंबई पोलिसांची टीम तेथे पोहोचली असता, त्यांना ती कार एका हाऊसिंग सोसायटीमध्ये उभी असल्याचे दिसली. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.बी. खरात यांनी सांगितले, की वाहनाच्या नोंदणी तपशीलांवरून आम्हाला पूजा खेडकर यांच्या बंगल्याचा पत्ता मिळाला. त्या बंगल्यात आम्हाला खेडकर यांची आई सापडली. याच घरातून कुमारची सुटका करण्यात आली.

रबाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बलकृष्ण सावंत यांनी सांगितले, “खेडकर यांच्या आईने तपासात सहकार्य केले नाही आणि अधिकृत कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना चौकशीसाठी रबाळे पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.” खेडकर आणि अज्ञात आरोपी यांच्यातील संबंधाबद्दल पोलिसांनी अजून माहिती दिलेली नाही.

पूजा खेडकर, 2023 बॅचच्या आयएएस अधिकारी होत्या. पुण्यात त्यांनी त्यांच्या खासगी ऑडी गाडीत ‘महाराष्ट्र शासन’ असा स्टिकर आणि लाल-निळा दिवा लावला होता. अगदी सहाय्यक कलेक्टर होण्यापूर्वीच त्यांनी कथितरीत्या व्हीआयपी क्रमांकाची सरकारी गाडी, निवासस्थान, आणि पुरेशा कर्मचाऱ्यांसह अधिकृत दालनाची मागणी केली होती जी विशेषाधिकार प्रशिक्षणार्थींना मिळत नाहीत. खेडकर यांनी स्वतःला ओबीसी प्रवर्गातील असल्याचा दावा केला आहे, परंतु त्यांच्या वडिलांच्या संपत्तीमुळे त्यांच्या ओबीसी पात्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या दरम्यान पूजाला युपीएससीतून बडतर्फही केले होते.