
हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी 15 सप्टेंबर रोजी बंजारा समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने बंजारा समाजातील बांधव सहभागी झाले होते. हैदराबाद गॅझेट लागू करताना महाराष्ट्र शासनाने दुजाभाव करू नये, बंजारा समाजास गॅझेटनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण द्यावे, एका महिन्यात आरक्षणाचा लाभ न दिल्यास महाराष्ट्रातील कोट्यावधी बंजारा समाज बांधव मुंबईत घुसून मुंबई जाम करतील, असा इशारा समाज बांधवांतर्फे यावेळी देण्यात आला.
आंध्रप्रदेश, तेलंगणा प्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी आज मस्तगड येथून मोर्चास सुरुवात झाली. पुढे गांधी चमन, शनी मंदिर, नूतन वसाहत मार्गे अंबड चौफुलीवर मोर्चाचे विराट सभेत रुपांतर झाले. मोर्चात समोर रथांमध्ये बंजारा समाजातील राष्ट्रसंत सेवालाल महाराज, स्व. वसंतराव नाईक यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमा, बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणारे भजनी मंडळ, वाद्यवृंद, पारंपरिक वेशभूषेत महिला, समाजबांधव मागण्यांची फलके घेऊन सहभागी झाले.
“आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं.., बंजारा समाजास एसटीचे आरक्षण लागू करा.., संत सेवालाल महाराज की जय.., वसंतराव नाईक साहेबांचा विजय असो.., एक गोर लाखो गोर.., आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही…!” अशा गगनभेदी घोषणा देऊन आंदोलकांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले.
गांधी चमन, शनी मंदिर, नूतन वसाहत मार्गे अंबड चौफुलीवर मोर्चाचे विराट सभेत रुपांतर झाले. चोहोबाजूंनी गर्दीने परिसर फुलून गेला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वेळी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणाबाबत नुकताच हैदराबाद स्टेट गॅझेट चा आधार घेऊन GR काढला आहे. या पार्श्वभूमीवर बंजारा समाज हा हैदराबाद स्टेट गॅझेटनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडत असताना भाषावार प्रांत रचनेनंतर महाराष्ट्रात बंजारा समाजाचा विमुक्त जाती प्रवर्गात समावेश करण्यात आला. हा अन्याय दूर करून बंजारा समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ द्यावा, हैद्राबाद गॅझेट लागू करावे, आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या स्व. पवन चव्हाण यांच्या कुटुंबास शासनाने 10 लाख रुपये मदत द्यावी, त्यांच्या कुटुंबातील एकास शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी माजी खा. हरिभाऊ राठोड, आ. राजेश राठोड, प्रा. संदेश चव्हाण, शरद राठोड, उद्धव पवार, अर्जुन नायक, अविनाश चव्हाण, सुरेश पवार, मोहन आडे, भीमराव राठोड, संदीप जाधव, जिजाबाई जाधव, अंबिका जाधव, निलेश राठोड, राजू नाईक, प्रतिभा चव्हाण, आकाश जाधव, राजपाल राठोड, जयकुमार राठोड, विजय चव्हाण, आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व सुत्रसंचालन उद्धव पवार यांनी केले तर गुलाब राठोड यांनी आभार मानले.
मोर्चात जिल्ह्यातील लाखो महिला, तरूण, लहान बालके, आबालवृद्ध समाज बांधव पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले. बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात अंबड चौफुली येथे सभास्थळी मराठा समाजातील संघटना, धनगर समाज, भगवान सेवा संघ, कैकाडी समाज, जोशी- यज्ञेकर समाज, मजदूर संघ सह विविध संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला.
मोर्चासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेत मोठा फौज फाटा तैनात केला. उपविभागीय पोलीस अधिकारी हे स्वतः देखरेख अधिकारी म्हणून कार्यरत होते. यावेळी 7 पोलीस निरीक्षक, 27 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 272 पोलीस अंमलदार, या सोबतच 2 दंगा नियंत्रण पथकातील 64 कर्मचारी असा मोठा लवाजमा तैनात करण्यात आला. स्वयंसेवकांनी प्रत्येक चौकात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीसांना मदत केली.