बदलापूरजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, मध्य रेल्वेवरील लोकलसेवा ठप्प

बदलापूर-अंबरनाथ स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी रेल्वे रुळावरुन चालत निघाले. सोमवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे प्रशासनाकडून मालगाडीच्या इंजिनची दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे.

मालागडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने एकाच जागी थांबली. यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणारी आणि कल्याणहून कर्जत-खोपोलीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. मध्य रेल्वेवरील स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी झाली आहे. लोकलसेवा ठप्प झाल्याने चाकरमान्यांना नाहक त्रास होत आहे. मालगाडीचे इंजिन दुरुस्त होऊन गाडी सुरू झाल्याशिवाय वाहतूक सुरळीत होणार नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशानाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दुरुस्ती कार्य हाती घेतले आहे.