
रविवारच्या आशिया कप स्पर्धेतील भारत-पाक क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून मोदीकृत भाजप सरकारने दहशतवाद्यांना उघड पाठिंबा दिला, आर्थिक बळ दिले. प्रत्येक भारतीय नागरिकाने या कृत्याचा धिक्कार केलाच पाहिजे. महाराष्ट्रातील ‘मिंधे’ गटाने भारतीय कप्तान सूर्यकुमारचे खास अभिनंदन केले हा ‘सिंदूर’ पुसल्या गेलेल्या भारतीय महिलांचा अपमान आहे. यास शुद्ध मराठी भाषेत ‘चाटूगिरी’ म्हणतात. यानिमित्ताने यांच्या हिंदुत्वाचे, राष्ट्रवादाचे ढोंग उघडे नागडे झाले. अरे, थूत् तुमच्या ढोंगावर!
निर्लज्जपणाचा कळस गाठून अखेर दुबईत भारत-पाकिस्तान सामना खेळवण्यात आला. महाराष्ट्रासह भारतात या सामन्यावर तसा बहिष्कारच होता. राष्ट्रभक्त लोकांनी सामना सुरू होताच आपापले टीव्ही बंद केले, पण भाजप व त्याच्या हस्तकांनी मात्र दारे-खिडक्या बंद करून पाकड्यांबरोबरच्या या खेळाचा मनसोक्त आस्वाद घेतला. सुनील गावसकर यांचे आम्ही खास अभिनंदन करतो. त्यांनी परखड सत्य सांगितले. ‘‘पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळ आणि क्रिकेटपटूंना तो मान्य करावा लागणार आहे.’’ गावसकर यांनी जे सांगितले त्यामुळे मोदी सरकारचा मुखवटा फाटला आहे. पाकिस्तानबरोबर खेळायला नाना पाटेकर यांनी विरोध केला. ‘‘माझ्या लोकांचे रक्त सांडले. ज्यांनी ते सांडवले, त्यांच्या सोबत मी खेळ का खेळावा?’’ असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. बऱयाच काळानंतर पाटेकरांनी हा प्रखर प्रहार केला आहे. पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याची जिद्द सरकारची होती. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जय शहा यांची होती. जय शहा यांचे ‘पप्पा’ अमित शहा हे दुर्दैवाने भारताचे गृहमंत्री आहेत हे समजून घेतले पाहिजे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी अमित शहांनी आपला पुत्र जय शहा यांना नेमले ते कोणत्या गुणवत्तेच्या आणि कर्तबगारीच्या आधारावर? क्रिकेटमध्ये जुगाराचा, सट्टेबाजीचा पैसा आहे. त्यामुळे निव्वळ व्यापार करण्यासाठीच जय शहा यांना क्रिकेटच्या व्यापारात आणले. राष्ट्रभक्तीशी याचा संबंध नाही. या सामन्यामुळे भाजपच्या देशभक्तीचे सोंग उघडे नव्हे, तर नागडे पडले आहे. दिलजीत दोसांझ याचा एक चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ दिला जात नाही. कारण काय तर म्हणे त्यात एका पाकिस्तानी अभिनेत्रीने काम केले आहे. मग आशिया कप क्रिकेट स्पर्धेत आता
पाकिस्तानच्या खेळाडूंनी
भारताबरोबर मैदानात खेळ केला व त्यावर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने एका दिवसात एक हजार कोटी कमावले, त्याला काय म्हणायचे? ही काय देशभक्ती आहे? भाजपची भूमिका दुतोंड्या गांडुळासारखी आहे. पंधरा दिवसांपूर्वी एका आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्याच्या वेळी काय घडले? मॅचच्या वेळी ब्राझील पोलिसांनी अर्जेंटिनाच्या एका समर्थकास मारहाण केली. त्या घटनेमुळे अर्जेंटिनाच्या टीमला इतकी चीड आली की, ‘‘हा आमच्या देशाचा अपमान आहे,’’ असे ठणकावून संपूर्ण टीम मैदानातून बाहेर पडली. मॅच खेळण्यास नकार दिला. आमच्या भारतीय क्रिकेट संघाने काय केले? 26 निरपराध भारतीयांची हत्या करणाऱ्या पाकिस्तानी टीमबरोबर ते क्रिकेट खेळले. हा सामना भारतीय टीम जिंकली असे म्हणतात. क्रिकेट सामन्यातील हा फिक्सिंग विजय सैन्याला अर्पण करण्याचा थिल्लरपणा भारतीय कप्तान सूर्यकुमार यादवने केला. हा भारतीय सैन्याचा आणि पुलवामा, पहलगाममधील शहीदांचा अपमान आहे. भारतीय कप्तानाने म्हणे पाकिस्तानी कप्तानाशी हस्तांदोलनही केले नाही. का? तर म्हणे पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून. पाकिस्तान आणि त्या देशाच्या क्रिकेट संघाविरोधात एवढाच राग व द्वेष आहे तर मग केंद्रातील स्वतःला राष्ट्रवादी वगैरे म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारने हा सामना खेळण्याची परवानगीच का दिली? ही ढोंगबाजी कशासाठी? भारतीय सैनिक देशाच्या शत्रूंशी युद्ध करतो व शहीद होतो. युद्धावर जाण्यासाठी तो कोटय़वधी रुपये घेत नाही. त्याची पत्नी, लहान मुले, कुटुंबीय अनाथ होतात. त्यांच्या आक्रोशाने धरणीही थरथरते. मात्र हे भारतीय क्रिकेट संघाला कधीच समजले नाही. भारतीय संघाला सैन्य आणि युद्ध म्हणजे खेळ वाटला काय? पहलगाम हल्ल्यात बळी पडलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे यांच्या
अश्रूंचा बांध
फुटला. त्या म्हणाल्या, ‘‘पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे म्हणजे दहशतवाद आणि निरपराध लोकांच्या मृत्यूला आमंत्रण आहे. पाकिस्तानशी हा असा खेळ मांडताना थोडी तरी लाज बाळगा!’’ आसावरी यांचे हे शब्द काळजाला घरे पाडणारे आहेत, पण सत्तेत बसलेले काय आणि आपल्या क्रिकेट बोर्डाची मंडळी काय, त्यांच्यासाठी हा सगळा पैशांचा खेळ आहे. ते कसली लाज बाळगणार? भारत-पाकिस्तान सामन्यातील भारताचा विजय हा जय शहा यांनी ‘मनोमीलन’ करून मिळवला. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला दुबईच्या सामन्यातून किमान हजार कोटी रुपये मिळाले. भारत-पाक सामन्यावर लाखो कोटींचा ‘सट्टा’ खेळला गेला. हे सटोडिया कोण, कुठले ते पहा. यातले किमान 50 हजार कोटी पाकिस्तानातील जुगारी व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचले, असे बोलले जात आहे. गंमत अशी की, ‘‘अशा सामन्यांवर ‘सट्टा’ लावण्याचे काम पाकिस्तानातून करणारे लोक भारतातून पळून गेलेले, मुंबईतील दहशतवादी कृत्यांत सहभागी झालेले आहेत’’ या प्रकारचे आरोप याआधी ‘भाजप’च्याच राष्ट्रभक्त मंडळाने केले आहेत. मग कालच्या मॅचवर जो ‘जुगार’ झाला त्यातले पैसेही तेथेच गेले. एक प्रकारे भारतात दहशतवाद घडविणाऱयांचे हात बळकट करण्याचे राष्ट्रकार्य भाजप सरकारने पार पाडले. रविवारच्या आशिया कप स्पर्धेतील भारत-पाक क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून मोदीकृत भाजप सरकारने दहशतवाद्यांना उघड पाठिंबा दिला, आर्थिक बळ दिले. प्रत्येक भारतीय नागरिकाने या कृत्याचा धिक्कार केलाच पाहिजे. महाराष्ट्रातील ‘मिंधे’ गटाने भारतीय कप्तान सूर्यकुमारचे खास अभिनंदन केले हा ‘सिंदूर’ पुसल्या गेलेल्या भारतीय महिलांचा अपमान आहे. यास शुद्ध मराठी भाषेत ‘चाटूगिरी’ म्हणतात. यानिमित्ताने यांच्या हिंदुत्वाचे, राष्ट्रवादाचे ढोंग उघडे नागडे झाले. अरे, थूत् तुमच्या ढोंगावर!