
उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. उजनी धरण 108 टक्के भरले असल्याने धरणातून भीमा नदीत 1 लाख क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. तर वीर धरण देखील शंभर टक्के भरले असल्याने त्यातून 17 हजार क्युसेक इतका विसर्ग नीरा नदीत सोडण्यात येत आहे. या दोन्ही विसर्ग संगम येथे एकत्रित येतात. त्यामुळे भीमा (चंद्रभागा) नदीला पुन्हा पुरसद़ृष्य परिस्थित निर्माण होऊ लागली आहे. हा विसर्ग मध्यरात्री पंढरपूरात दाखल होण्याची शक्यता असून चंद्रभागेतील मंदिरांना पाण्याचा वेढा पडणार आहे त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
उजनी धरण 108 टक्के भरले आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सोडण्यात आलेल्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे. सोमवार (15 सप्टेंबर 2025) सकाळी 10 वाजता 1 लाख क्यूसेक्स एवढा विसर्ग सोडण्यात आला आहे.ध रण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे या विसर्गामध्ये आवश्यकते नुसार वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच वीर धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढले आहे. वीर धरणातूनही 17 हजार क्युसेक विसर्ग नीरा नदीच्या पात्रात सुरू करण्यात आला आहे. पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.
भीमा नदीच्या दोन्ही तिरावरील सर्व नागरिकांनी याबाबत सावधानता बाळगावी. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. अशा सुचना कार्यकारी अभियंता भीमा व नीरा पाटबंधारे विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.