
>>संजय कऱ्हाडे
दोस्त लोक चला, आज थोडी गंमत. आजच्या बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याचं भाकित सामन्यापूर्वीच करतो. माझा अंदाज चुकला तर तुम्ही मला दोष द्या, शिव्या घाला, अगदी मला क्रिकेट कळत नाही असं म्हटलंत तरी चालेल. माझं म्हणणं योग्य ठरलं तर मीच माझी पाठ थोपटून घेईन. ज्या सामन्यात आपल्याला सर्वसाधारणपणे रस नसतो तेंव्हा अशा गमती-जमती करून उत्सुकता-उत्पंठा निर्माण करावी लागते अन्यथा माझे चार शब्द कोण वाचणार! (ही गंमत आहे. पैसा-अडका, मूल्यवान वस्तू, वास्तू इ. पणाला नका बरें लाऊ!)
तर बांगलादेश आणि अफगाणिस्थान दोन्ही संघांनी टिंगटाँगला – हाँगकाँगला हो – या स्पर्धेत चांगलंच दमटवलंय. बांगलादेशने सात गाडी राखून तर अफगाणिस्तानने चक्क 94 धावांनी. एकूण दोन्ही संघ एकमेकांसमोर दंड थोपटून ठाकतील. पण माझं मन मला सांगतंय की, अफगाणिस्तानचा संघ सामना जिंकेल. प्रत्यक्षात काय होतं ते आपण पाहूच!
संयुक्त अमिरात आणि पाकिस्तानसह खेळलेल्या तिरंगी युद्धात, म्हणजे मालिकेत अफगाणिस्तानने आशिया कपपूर्वी बाजी मारली होती. ही आठवण त्यांना उत्साह देईल. शिवाय श्रीलंकेकडून पत्करावा लागलेला पराभव बांगलादेशला सतावत असेल. आता त्या पराभवामुळे ते खचून जातील की नव्या जोमाने मैदानात उतरतील हे प्रत्यक्ष सामन्यात दिसेल. पण बांगलादेशच्या फलंदाजांची मनःस्थिती द्विधा असण्याची शक्यता नाकारता येत नाही!
दोन्ही संघाचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी टिंगटाँगला हरवताना दर्जेदार होतं. प्रश्न राहिला फलंदाजीचा. इथे बांगलादेशी फलंदाज दडपणाखाली येऊन दबकू शकतात. कारण फिरकीबाज रशीद खान आणि नूर अहमद यांना टिंगटाँगविरुद्ध फारसं यश मिळालेलं नव्हतं. दोघंही दर्जेदार गोलंदाज आहेत! आणि अधिक यश मिळवण्यासाठी आपापल्या बोटांना धार काढत असतील. आता लिटन दासचा आक्रमक पवित्रा जिंकतो की फिरकीची जत्रा जिंकते हेच पहायचं!
ता.क. माझं म्हणणं पन्नास टक्के खरं ठरतं, हे शंभर टक्के खरं आहे!