
हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील फ्लॉपबस्टर सामन्याचे कवित्व अजून संपलेले नाही. या सामन्यात हिंदुस्थानने खेळू नये अशी इच्छा तमाम हिंदुस्थानी नागरिकांची होती. तशीच इच्छा हिंदुस्थानी क्रिकेटपटूंच्या मनातही होती, पण जागतिक क्रिकेटचा कुबेर असलेल्या बीसीसीआयच्या दबावामुळे हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना पाकिस्तानविरुद्ध खेळावे लागले असा धक्कादायक दावा हिंदुस्थानचा माजी स्टार फलंदाज सुरेश रैनाने केला.
मोदी सरकारने दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानच्या क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्याची परवानगी दिल्यानंतर हिंदुस्थानच नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी या सामन्याला विरोध दर्शवला होता, पण सर्वांना बाजूला सारत हा सामना खेळला गेला. हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी परखड भूमिका हरभजन सिंग, केदार जाधव अशा मोजक्याच क्रिकेटपटूंनी घेतली. त्यात सुरेश रैनानेही आपले मत मांडण्याचे धाडस केले. तो म्हणाला, मी खात्रीने सांगू शकतो, जर खेळाडूंना स्वतंत्रपणे विचारलं असतं, तर कोणीच या सामन्यात खेळायला तयार झाला नसता. बीसीसीआयच्या दबावामुळे खेळाडूंना जबरदस्तीने या सामन्यात उतरावं लागलं. मला दुःख आहे की, हिंदुस्थान पाकिस्तानविरुद्ध खेळला. जर सूर्यकुमार यादव आणि त्याच्या संघाची खरी मतं जाणून घेतली असती, तर त्यांनी ‘नाही’च म्हटलं असतं.