
पहलगाम हल्ल्यात 26 माताभगिनींचे कुंकू पुसले गेले. त्याची प्रत्येकाच्या मनात चीड आहे. दहशतवाद पोसणाऱया पाकिस्तानसोबत कसलेच संबंध ठेवू नयेत, अशी सर्वांचीच भावना आहे. त्याचेच पडसाद रविवारी संपूर्ण देशात पाहायला मिळाले. सच्चा क्रिकेटप्रेमींनीही कालचा हिंदुस्थान-पाकिस्तान सामना पाहिला नाही.
क्रिकेटवेडा देश अशी हिंदुस्थानची ओळख आहे. त्यातही हिंदुस्थान-पाकिस्तान सामना म्हटलं की क्रिकेटप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहचलेली असते. मात्र रविवारी वेगळं चित्र पाहायला मिळालं. त्याला पार्श्वभूमी अर्थातच पहलगाम दहशतवादी हल्ल्याची होती.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध देशभरात संतप्त भावना आहेत. पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध नकोत. क्रिकेट वा अन्य कोणताच खेळही नको, असा आक्रोश सातत्याने पीडित कुटुंबं करत आहेत. त्यानंतही केंद्रातील मोदी सरकारने या सामन्याला परवानगी देऊन पाकिस्तानसोबत खेळ मांडला. सरकारचा हा निर्णय देशात कुणालाच आवडला नाही.
सूर्यकुमारला सुनावले
सामन्याच्या टॉस वेळी हिंदुस्थानचा कर्णधार सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन केले नाही. विजयानंतर सेलिब्रेशन टाळले. हा विजय आम्ही लष्कराच्या जवानांना समर्पित करतो, आम्ही पहलगामच्या पीडित कुटुंबांसोबत आहोत, असे सूर्यकुमार म्हणाला. त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तुम्ही पाकिस्तानसोबत न खेळण्याची धमक दाखवली असती तरच तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार होता, असे नेटकऱयांनी हिंदुस्थानी क्रिकेट संघाला सुनावले.
- क्लब, जिमखाने, बार, रेस्टॉरंट्स अशा ठिकाणी मोठय़ा स्क्रीनवर सामने लावले जातात. मात्र काल कुठेच असे चित्र पाहायला मिळाले नाही. क्रिकेटप्रेमी हिंदुस्थान-पाकिस्तान सामना म्हटलं की टीव्हीसमोरून ढळत नाहीत पण त्यांनीही या सामन्याकडे पाठ फिरवली.
- पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकल्यानंतर फटाके फुटतात. जल्लोष होतो. बाईक-कार रॅली निघतात. मात्र असं कोणतंही सेलिब्रेशन कुठेच दिसलं नाही.