
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील मध्य विभागाने अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा 6 विकेटस्नी पराभव करीत तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दुलीप करंडकावर आपले नाव कोरले. पाचव्या दिवशी दोन तासांत मध्य विभागाने आपल्या जेतेपदाची औपचारिकता पूर्ण केली. याच पाटीदारच्या नेतृत्वाखाली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले होते. आयपीएल जेतेपद पटकाविल्यानंतर पाटीदारच्या नेतृत्वात आणखी कमाल झाली अन् मध्य विभागाने दुलीप ट्रॉफी जिंकण्याची स्वप्नपूर्तीदेखील केली.
बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे झालेल्या या सामन्यात मध्य विभागाने पहिल्याच दिवसापासून वर्चस्व गाजवत दक्षिण विभागाला पहिल्या डावात अवघ्या 149 धावांत गुंडाळले. या कामगिरीत कार्तिकेय सिंहने चार गडी बाद केले, तर सारांश जैनने सलग तिसऱ्यांदा पाच बळी घेतले. प्रत्युत्तरात यश राठोडच्या दमदार 194 धावा आणि कर्णधार रजत पाटीदारच्या शतकी (101) खेळीच्या जोरावर मध्य विभागाने पहिल्या डावात 511 धावांचा डोंगर उभा केला. दक्षिण विभागाने दुसऱ्या डावात अंकित शर्मा (99) आणि आंद्रे सिद्धार्थ (84 नाबाद) यांनी दमदार खेळी करत काहीशी आशा दाखवली होती. त्यांनी 64 धावांची आघाडीही घेतली, पण त्यांचा डाव चौथ्या दिवशीच संपुष्टात आला.
आज अखेरच्या दिवशी 65 धावांची गरज असताना विजयाची घाई झालेल्या मध्य विभागाने चार गडी गमावले. दानिश मालेवार (5), शुभम शर्मा (8), सारांश जैन (4) आणि पाटीदार (13) लवकर बाद झाले. मात्र अक्षय वाडकर (नाबाद 19) आणि यश राठोड (नाबाद 13) यांनी संघाला कोणताही अतिरिक्त धक्का न बसू देता 20.3 षटकांत 4 बाद 66 धावा करीत विजयी लक्ष्य गाठले. यश राठोड या अंतिम सामन्याचा मानकरी ठरला, तर सारांश जैनला मालिकावीराचा बहुमान मिळाला.
कर्णधार म्हणून स्वप्नवत प्रवास
ही दुलीप ट्रॉफी जिंकणाऱ्या रजत पाटीदारचा कर्णधार म्हणून स्वप्नवत प्रवास सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने आरसीबीला पहिला आयपीएल किताब जिंकून दिला होता आणि 18 वर्षांपासूनचा ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपवला होता. आता मध्य विभागालाही दहा वर्षांनंतर विजेतेपद मिळवून देत पाटीदारने आपली नेतृत्वशैली ठळकपणे दाखवून दिली आहे.
कार्तिकेय–जैन जोडीचे पाटीदारकडून कौतुक
दुलीप ट्रॉफी विजेता कर्णधार रजत पाटीदारने मध्य विभागाच्या संपूर्ण संघाचे आणि विशेषतः दोन फिरकीपटू कुमार कार्तिकेय व सारांश जैन यांचे काwतुक केले. या दोन्ही फिरकीपटूंनी अंतिम सामन्यात एकूण 16 बळी घेत मध्य विभागाला 2014-15 नंतर पहिल्यांदा दुलीप ट्रॉफी किताब जिंकून दिला. दक्षिण विभागावर 6 गडी राखून मिळालेल्या या विजयात त्यांचा मोठा वाटा होता. पाटीदार म्हणाला, ‘‘कार्तिकेय आणि सारांश यांनी एकत्रितपणे अनेक सामने खेळले आहेत. त्यांच्या काwशल्यामुळे आणि या विकेटवरील अफलातून गोलंदाजीपुढे फलंदाजांना खेळणे कठीण झाले. विकेट फलंदाजीसाठी उत्तम होती तरी आमच्या गोलंदाजांनी त्यावर वर्चस्व गाजवले हे सकारात्मक चिन्ह होते.’’
‘‘पहिल्या डावात अधिक धावा जमवल्या असत्या किंवा दुसऱ्या डावातील भागीदारी आणखी मोठी झाली असती, तर सामना रंगतदार झाला असता. चौथ्या डावात 150 धावांचे लक्ष्य असते, तर आमच्या गोलंदाजांसाठी ती आदर्श परिस्थिती ठरली असती.’’
– एल. बालाजी (प्रशिक्षक, दक्षिण विभाग)