
शहापूरचे शिरोळ प्राथमिक आरोग्य केंद्र लालफितीत अडकले आहे. मंजुरी मिळून एक वर्ष उलटले तरी जमिनीचे हस्तांतर झालेले नाही. आरोग्य केंद्र उभारण्यात येणाऱ्या जागेच्या हस्तांतरणाची फाईल जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर पडून आहे. एकीकडे आदिवासी पाड्यावरील गोरगरीब रुग्णांना खर्डी व कसारा येथील रुग्णालयात उपचारासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान ग्रामस्थ गेल्या 13 वर्षांपासून पाठपुरावा करीत असूनदेखील जमिनीच्या हस्तांतरणाचा विषय मार्गी लागला नाही.
शहापूर तालुक्याच्या शिरोळ गावातील ग्रामस्थांना योग्य आणि वेळेवर उपचार मिळावे यासाठी उपकेंद्राला प्राथमिक आरोग्य केंद्र करण्यासाठी शासनाने ऑगस्ट 2024 मध्ये मंजुरी दिली. मंजुरी मिळून एक वर्ष उलटल्यानंतर आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी उपलब्ध असलेल्या पावणेतीन एकर जमिनीची मोजणी जून 2025 मध्ये करण्यात आली. या जागेचे हस्तांतरण करण्यासाठी फाईल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश घनघाव यांनी सांगितले.
.. तर 25 हजारांच्या लोकसंख्येच्या पाड्यांना दिलासा
या भागात शिरोळ, कुंदन, गोपाळ पाडा, उंबरमाळी, फणसपाडा, भगतपाडा, करंजपाडा, वारली पाडा, पेठ्याचा पाडा, अजनुप, दापूर, माळ आदी गावे आहेत. शिरोळ प्राथमिक आरोग्य केंद्र झाल्यास 15 गावांतील सुमारे 25 हजारांच्या आसपास लोकसंख्येच्या गाव पाड्यांना दिलासा मिळू शकणार आहे. उपकेंद्राचे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूपांतर झाल्यास 15 अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध होणार आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतरच नवीन इमारत बांधण्यात येणार असल्याचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले होते. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र हे कागदावर असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
शहापुरात आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. तो ताण कमी करण्यासाठी व अतिदुर्गम भागातील रुग्णांना आरोग्य केंद्राचा पर्याय उपलब्ध होणार होता.
ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्यांना विंचू, साप दंशापासून साथीच्या आजारापर्यंत अनेक गोष्टींसाठी या आरोग्य केंद्रांवर अवलंबून राहावे लागते.
ग्रामीण भागातील गर्भवती महिला, लहान मुलांच्या आरोग्याचीही मोठी जबाबदारी आरोग्य केंद्रांवर आहे. सध्या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या कामास शासकीय स्तरावर विलंब होत आहे. एखादा आजारी पडल्यावर खर्डी व शहापूर येथे उपचारासाठी जावे लागत असल्याने गैरसोय होत आहे. याकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांना लक्ष घालून आरोग्य केंद्राची इमारत बांधून द्यावी. – राजेश घनघाव (ग्रामस्थ)